कौशांबी : उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका खाजगी डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या तरुणीला भुलीचे इंजेक्शन देऊन तिचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर डॉक्टरने पीडितेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कौशाम्बी जिल्ह्यातील पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. पीडित तरुणी उपचारासाठी गावातीलच एका डॉक्टरकडे गेली होती. आरोपी डॉक्टरचे नाव करन पटेल असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने तरुणीला भुलीचे इंजेक्शन दिले. तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर डॉक्टरने मोबाईलमध्ये तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढले.
शुद्धीवर आल्यानंतर पीडितेला या प्रकाराची कल्पना नव्हती, मात्र काही दिवसांनी डॉक्टरने तिला संपर्क साधून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “जर तू मला भेटायला आली नाहीस, तर तुझे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन,” अशी धमकी डॉक्टरने दिली.
कुटुंबीयांचा संताप आणि पोलिसांत धाव डॉक्टरच्या सततच्या त्रासाला कंटाळून आणि भीतीपोटी पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पीडितेच्या भावाने जाब विचारण्यासाठी डॉक्टरचे क्लिनिक गाठले. यावेळी झालेल्या वादावादीनंतर आरोपी डॉक्टरने पीडितेच्या भावाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या गंभीर प्रकारानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ पिपरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टर करन पटेल विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 77 आणि 352 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.













