बारामती दि.५ फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी एक्झिटनंतर संपूर्ण बारामती शहर आणि पवार कुटुंब सध्या अतीव दुःखात आहे. या घटनेला आठ दिवस पूर्ण झाले असूनही विद्या प्रतिष्ठानच्या आवारात कार्यकर्त्यांची रीघ काही केल्या कमी होत नाहीये. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी म्हणजेच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांना जाणवलेली पोकळी आणि तिथली अस्वस्थ करणारी शांतता त्यांनी सोशल मीडियावर एका अत्यंत भावूक पोस्टद्वारे मांडली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, एरवी विद्या प्रतिष्ठानमध्ये कोणत्याही कामानिमित्त किंवा कार्यक्रमासाठी येताना मनाला एक वेगळा आनंद आणि उत्साह असायचा. मात्र, आज इथे आल्यावर पाय जड झाले आहेत, अंतःकरण भरून आलं आहे. संस्थेच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर जी भयान शांतता जाणवली, ती अंगावर काटा आणणारी होती. आजूबाजूची झाडंही स्तब्ध उभी आहेत, जणू काही ती सुद्धा दादांच्या जाण्याचा शोक व्यक्त करत मूकपणे रडत आहेत. या परिसरातील पक्षांचा नेहमीचा किलबिलाटही आज गायब झाला असून सर्वत्र फक्त उदासी पसरली आहे.
ज्या चौथऱ्यावर दादांवर अंत्यसंस्कार झाले, तिथे नतमस्तक होताना जुन्या आठवणींनी मनाला घेराव घातला. दादांना जाऊन आठ दिवस झाले, तरीही रात्री उशिरापर्यंत लोक इथे येऊन फुलं वाहत आहेत, डोळ्यातल्या पाण्याने श्रद्धांजली देत आहेत. लोकांच्या या प्रेमातून आणि तिथे साचलेल्या फुलांच्या राशीतून दादांची खरी श्रीमंती दिसून येते. नाशिकहून आलेली काही लहान मुलंही दादांना शेवटचं भेटायला आली होती. हे सर्व पाहून मन भरून आलं. दादांच्या आत्म्याला चिरशांती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.













