नांदेड दि.६ फेब्रुवारी: कंधार शहरात घरफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असतानाच, पोलीस श्वान पथकातील ‘कोको’ हिने आपल्या अफाट बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. महाराणा प्रताप चौक परिसरातील ‘वरद मोबाईल शॉपी’ फोडणाऱ्या चोरट्यांचा छडा लावण्यात कोकोने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
नेमकी घटना आणि थरार :
महाराणा प्रताप चौक परिसरातील ‘वरद मोबाईल शॉपी’ हे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून आतून मुद्देमाल लंपास केला होता. घटनेची माहिती मिळताच तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्नेहा पिंपरखेडे यांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले.
श्वान पथक प्रमुख श्री. महंमद आयुब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकोला घटनास्थळी आणले गेले. दुकानातील ‘ड्रॉप’चा वास दिल्यानंतर कोकोने तातडीने माग काढण्यास सुरुवात केली. कोकोने पानभोसी रोडच्या दिशेने धावत तब्बल १ किलोमीटर पर्यंत चोरट्यांचा माग काढला आणि ती थेट एका संशयित घराजवळ जाऊन थांबली. कोकोच्या या अचूक सुगाव्यामुळे पोलिसांना तपासासाठी अत्यंत ठोस दिशा मिळाली आहे.
या टीमने फत्ते केली मोहीम :
ही यशस्वी कामगिरी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक स्नेहा पिंपरखेडे यांच्यासह कंधार पोलीस स्टाफने परिश्रम घेतले. यामध्ये श्वान हस्तक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. शिवाजी पाटील सर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. दत्ता गायकवाड यांनी कोकोसोबत राहून हा तपास पूर्ण केला.
परिसरात कौतुकाचा वर्षाव:
कोकोच्या या कामगिरीची चर्चा सध्या संपूर्ण कंधार तालुक्यात होत आहे. गुन्हेगारांमध्ये धडकी भरवणारी ‘कोको’ आणि सतर्क कंधार पोलीस प्रशासनाचे नागरिक भरभरून कौतुक करत आहेत.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













