मुंबई दि.७ फेब्रुवारी: मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती स्पष्ट करत उमेदवार जाहीर केला, तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महापौरपदाची ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय जनता पक्षाने घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ च्या नगरसेविका ऋतुजा तावडे यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. महायुतीकडे असलेल्या नगरसेवकांचे संख्याबळ पाहता ऋतुजा तावडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. अशा परिस्थितीमध्ये, विरोधात उमेदवार देऊन निवडणूक लढवायची की नाही, यावर ठाकरे गटाने विचारमंथन केले. अखेर, मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत, आम्ही महापौरपदाच्या शर्यतीत उमेदवार उतरवणार नाही, असे जाहीर केले.
हा निर्णय घेण्यापूर्वी ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार संजय राऊत, किशोरी पेडणेकर आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या चर्चेनंतरच महायुतीच्या उमेदवाराविरोधात आपला उमेदवार न देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या निर्णयाबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “२०२२ पासून आमची लढाई सुरू आहे. आमचे संख्याबळ जरी कमी जास्त झाले असले, तरी मुंबईत ‘मराठी माणूस’ जिंकला आहे हे महत्त्वाचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मुंबईत जो जनादेश मिळतो, त्याचा वापर कुणी केवळ गरजेपुरता करत असेल तर ते जनतेला दिसत आहे. आमची लढाई ही केवळ आणि केवळ मराठी अस्मितेसाठी होती आणि ती आम्ही कायम लढत राहू.”
त्या पुढे म्हणाल्या की, “भाजप जर एक मराठी महापौर देत असेल, तर आम्ही त्यात कोणतेही विघ्न आणणार नाही किंवा अपशकुन करणार नाही.” यावेळी त्यांनी निवडणुकीतील आकड्यांचे गणितही स्पष्टपणे मान्य केले. “आम्हाला संख्याबळाचे गणित मान्य आहे. पूर्वी आम्ही सत्तेत असतानाही विरोधी पक्षाची भूमिका पाहिली आहे, त्यामुळे आताही आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता, आमचे नगरसेवक प्रभागातील प्रश्न मांडतील आणि मुंबईच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे, ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गटाच्या या माघारीमुळे भाजपच्या उमेदवार ऋतुजा तावडे यांच्या विजयाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.













