मुंबई दि.७ फेब्रुवारी : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली असून, पक्षाने घाटकोपरच्या नगरसेविका रितू तावडे यांना महापौरपदासाठी आपली अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौरपदाची निवडणूक पार पडणार असून, रितू तावडे यांचा विजय झाल्यास त्या मुंबईच्या पहिल्या महिला भाजप महापौर ठरतील. तसेच, तब्बल २९ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भाजपला हे मानाचे पद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
रितू तावडे या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून सलग तीन वेळा निवडून आलेल्या अनुभवी नगरसेविका आहेत. दुसरीकडे, महायुतीमधील भागीदार असलेल्या शिवसेनेकडून संजय घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपने रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करताच, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील जुने आणि गंभीर वाद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.
यापूर्वी रितू तावडे यांच्यावर करण्यात आलेले कथित मारहाणीचे गंभीर आरोप आणि त्या अनुषंगाने पक्षाने त्यांना बजावलेली ‘कारणे दाखवा’ (Show Cause) नोटीस हा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. यासोबतच त्यांचा जुना वादग्रस्त ‘अंदमान दौरा’ देखील पुन्हा उकरून काढला जात आहे. या सर्व जुन्या वादांची पार्श्वभूमी असतानाही, भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना महापौरपदाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात रितू तावडे यांच्या उमेदवारीसोबतच त्यांच्या भूतकाळातील या वादग्रस्त प्रकरणांचीही (वादग्रस्त कारकीर्द) जोरदार चर्चा सुरु झाली आहे.













