सोलापूर दि.९ फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. लक्ष्मण हाके यांनी आगामी काळात होणाऱ्या राजकीय घडामोडींबद्दल वर्तवलेल्या भाकिताचा समाचार घेताना प्रकाश महाजन यांनी, “लक्ष्मण हाके यांनी आता आपली ओबीसी संघटना सोडून भविष्य सांगण्याचा नवीन धंदा सुरू केला आहे का?” असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. हाके यांनी २०२९ च्या निवडणुकांबाबत केलेल्या विधानावर महाजन यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, स्वतःचे भविष्य माहिती नसलेली माणसे आता राजकीय पक्षांचे भविष्य सांगायला लागली आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ दाव्यावर महाजनांचा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणात २०२९ साली मोठे भूकंप होतील, असा दावा केला होता. हाके यांच्या मते, २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सध्याची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली असतील. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासोबत जातील, तर सध्या सत्तेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्यासोबत युती करतील, असे खळबळजनक भविष्य हाके यांनी वर्तवले होते. तसेच २०२९ मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकाच आघाडीत असतील, असेही त्यांनी म्हटले होते.
या विधानावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन यांनी लक्ष्मण हाकेंच्या मानसिक स्थितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “सध्या २०२६ साल सुरू आहे, पण यांना २०२९ मध्ये काय होणार हे आताच समजत आहे. जर यांना इतके भविष्य कळते, तर त्यांनी स्वतःचे पुढे काय होणार आहे हे देखील सांगावे.” ज्यांना स्वतःच्या राजकीय भवितव्याचा थांगपत्ता नाही, अशी मंडळी आता पक्षांचे भविष्य सांगत फिरत आहेत. लक्ष्मण हाके यांची सध्याची मनस्थिती खरोखरच ठीक आहे का, याची तपासणी करण्याची गरज आहे, अशा शब्दात महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
‘ईव्हीएम’ आणि ‘बॅलेट पेपर’वर रोखठोक मत यावेळी प्रकाश महाजन यांनी मोहोळमधील ईव्हीएम प्रकरणावर आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर आपली भूमिका स्पष्ट केली. मोहोळमध्ये ईव्हीएमबाबत जो प्रकार घडला, त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असून, संबंधित दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. राखीव ईव्हीएम जरी असले, तरी त्याचाही गैरवापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईव्हीएममधील तंत्रज्ञानाचा किंवा त्या मशीनचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो, त्यामुळे ज्यांनी कामात कसूर केली आहे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
याचबरोबरीने, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जी मागणी केली होती, तिचे समर्थन करताना प्रकाश महाजन यांनी एक महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, “लोकांच्या मनातील ईव्हीएमविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी एकदा तरी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतलीच पाहिजे.” ज्या पक्षांचे संघटन मजबूत आहे, त्यांना निवडणूक ईव्हीएमवर झाली काय किंवा बॅलेट पेपरवर झाली काय, काहीच फरक पडत नाही. लोकांचा संशय दूर करण्यासाठी हा प्रयोग करायला हरकत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
संघावर टीका करणाऱ्यांना सुनावले खडेबोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) आणि सरसंघचालकांबद्दल केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देताना प्रकाश महाजन यांनी संघाची कार्यपद्धती समजावून सांगितली. ते म्हणाले की, आम्ही जेव्हा संघाच्या शाखेवर जातो, तेव्हा शेजारी उभा असलेला स्वयंसेवक कोणत्या जातीचा आहे, हे कधीच विचारले जात नाही. संघाचे काम हे जातीपातीवर चालत नाही, तर निष्ठेवर चालते. भिकू इदाते असोत किंवा रज्जू भैय्या, हे कोणी जातीमुळे मोठे झाले नाहीत, तर त्यांच्या कामामुळे आणि त्यागामुळे त्यांना सन्मान मिळाला.
जात बघून नव्हे, तर हिंदू धर्मावरील निष्ठा आणि कामाचा व्याप बघून सरसंघचालक ठरवले जातात. रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उचलून सरसंघचालक केले जात नाही. त्यासाठी आयुष्य खर्ची घालावे लागते. २५-५० वर्षे निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांनाही अनेकदा सरसंघचालक होता येत नाही, तरीही त्यांची कधीच काही तक्रार नसते. मात्र, ज्यांचा संघाशी काहीही संबंध नाही, अशी बाहेरील लोकच ‘याला का केले नाही? त्याला का केले नाही?’ असे फुकटचे प्रश्न विचारत बसतात. अशा लोकांनी आधी शाखेवर जावे, तिथला त्याग अनुभवावा आणि मगच प्रतिक्रिया द्यावी, अशा शब्दात महाजन यांनी विरोधकांचा समाचार घेतला.












