गजानन राऊत
बुलढाणा दि.३ एप्रिल:
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने गावातील प्रसिद्ध जगदंबा देवी मंदिर परिसरातील मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
हनुमानाच्या प्राचीन मूर्तीवर जलाभिषेक करून विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली. हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध पारंपरिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गावातील जुनी परंपरा जपत रात्रभर महाभारत, राम-लक्ष्मण कचेरी यांसारखी सोंगे सादर करण्यात आली. तसेच सकाळी जगदंबा देवी व दैत्याचे सोंग रंगवण्यात आले. रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सोंग सादर करण्यात आले, ज्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मारुती मंदिर परिसर आकर्षक पताकांनी सजवण्यात आला होता. सकाळ व संध्याकाळी नियमित आरती करण्यात आली असून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
सकाळच्या जगदंबा देवीच्या सोंगात विष्णू रतन मानघाले यांनी भूमिका साकारली, तर दैत्याची भूमिका संतोष अंभोरे यांनी साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक पद्धतीने सोंगाची पूजा-अर्चा करण्यात आली आणि महिला व पुरुषांनी देवीसमोर लोटांगण घालत श्रद्धा व्यक्त केली.






















