नांदेड दि.५ जुलै : सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानची गुप्तचर संघटना (ISI) भारतीय तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर इशारा नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, काही संशयित एजंट सोशल मीडियावर मैत्री करून तरुणांकडून संवेदनशील ठिकाणांचे फोटो व माहिती मागवत आहेत आणि त्यासाठी पैशांचे आमिष दाखवत आहेत.डॉ. रोहन यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारे पाठवलेला एखादा फोटो किंवा माहिती देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या संपर्काला बळी पडू नये. संशयास्पद कॉल, संदेश किंवा ऑनलाइन संपर्क आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी त्यांनी नांदेड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवरही चिंता व्यक्त केली. “फक्त दोन मिनिटांचे काम आहे” या कारणावरून अनेक नागरिक वाहने रस्त्यावर किंवा चुकीच्या ठिकाणी उभी करतात, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, असे त्यांनी सांगितले.या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतः रस्त्यावर उतरून पायी पाहणी करत असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. नागरिकांनी वाहने केवळ अधिकृत आणि इतरांना अडथळा होणार नाही अशा ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.देशाची सुरक्षा आणि शहरातील वाहतूक व्यवस्था या दोन्ही बाबींमध्ये नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची असून, सतर्कता आणि वाहतूक शिस्त पाळल्यास मोठे धोके टाळता येऊ शकतात, असे डॉ. नीलाभ रोहन यांनी नमूद केले.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!












