मतदारांनी ‘Enumeration Form’ भरून देणे बंधनकारक; अन्यथा नाव वगळले जाण्याची शक्यता
तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!
भारत निवडणूक आयोगामार्फत हदगाव तालुक्यामध्ये ३० जून ते ०७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर)कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक मतदाराने ‘enumeration फॉर्म’ भरून देणे आवश्यक आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सय्यद उमर यांनी दिली आहे. या राष्ट्रीय कर्तव्य व महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी सर्व मतदारांनी प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
२५ व २६ जून रोजी बीएलओंचे सविस्तर प्रशिक्षण संपन्न
या विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी हदगाव तालुक्यातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ – BLO) तसेच बीएलओ पर्यवेक्षक यांना दिनांक २५ व २६ जून रोजी पंचायत समिती सभागृह, हदगाव येथे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात मोहिमेची अचूक अंमलबजावणी आणि फॉर्म भरून घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
३० जून ते २९ जुलै दरम्यान ‘बीएलओ’ येणार घरोघरी.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ३० जून ते २९ जुलै २०२६ या काळात सर्व बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या गृहभेटी दरम्यान ते प्रत्येक मतदाराला ‘enumeration फॉर्म’ दोन प्रतींमध्ये देतील.
मतदारांसाठी महत्त्वाच्या सूचना फॉर्म भरणे आवश्यक मतदारांनी हा enumeration फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरून त्याची एक प्रत संबंधित बीएलओ यांच्याकडे परत करणे आवश्यक आहे.
मतदारांची जबाबदारी फॉर्म भरून तो बीएलओकडे वेळेत जमा करण्याची मुख्य जबाबदारी संबंधित मतदाराची राहील.
फोटो जोडणे बंधनकारक फॉर्मसोबत मतदारांनी आपला नजीकच्या काळातील पासपोर्ट साईजचा कलर फोटो जोडणे अनिवार्य आहे.
फॉर्म न भरल्यास प्रारूप यादीत नाव येणार नाही!
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जे मतदार हा ‘enumeration फॉर्म’ भरून देणार नाहीत, अशा मतदारांची नावे आगामी प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जाणार नाहीत. त्यामुळे आपले मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे.
तालुक्यातील सर्व नागरिकांनी व मतदारांनी या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आणि तहसीलदार सय्यद उमर यांनी संयुक्तपणे केले आहे.












