दाऊ गाडगेवार! हिमायतनगर प्रतिनिधी!
खैरगाव ते मंगरूळ, वारंगटाकळी या गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह शाळकरी विद्यार्थी, गरोदर माता, वृद्ध नागरिक आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असते. मात्र रस्त्याची दुरवस्था इतकी गंभीर झाली आहे की, वाहन चालविताना खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. काहींना गंभीर दुखापती झाल्याच्या घटनाही घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून गरोदर माता व वृद्ध नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे “निवडणुकीच्या वेळीच नागरिकांची आठवण होते का ?” असा संतप्त सवाल परिसरातील निगरिक उपस्थित करत आहेत. खैरगाव–मंगरूळ–वारंगटाकळी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##










