मुंबई दि.२३: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यातील महाविकास आघाडीच्या जागांचा तिढा जर अद्याप सुटत नसेल तर, आम्ही त्यांच्यात कुठे शिरायचे? आम्हाला आजही त्यांच्यात समझोता झालाय याबाबत काहीच कळविण्यात आले नाही. वंचित बहुजन आघाडी आता २६ मार्चपर्यंत शेवटची वाट पाहणार आहे, त्यानंतर आम्ही काय तो योग्य निर्णय घेणार आहोत, असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मुंबईत ते आज (दि. २३ मार्च) एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीच बाळासाहेबांनी कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याबद्दल शाहू महाराजांनी देखील बाळासाहेबांचे आभार मानले आहेत.
कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना ‘वंचित’चा पाठिंबा:
बाळासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवते आणि कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांबद्दल आम्हाला अपार आदर आहे, असं बाळासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत.
छत्रपती शाहू महाराजांनी मानले बाळासाहेबांचे आभार: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज बाळासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांना जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल शाहू महाराज छत्रपती यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार व्यक्त केले आहेत. शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानतो!

वडिलांना मिळालेल्या उमेदवारीमुळे संभाजीराजेंनी केले ट्विट: कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच शाहू महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांनी आज ‘एक्स’ या समाजमाध्यमावर ट्विट करून आपली भूमिका मांडली. आपल्या वडिलांना उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं तसेच निवडणुकीत जिंकून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपण आपल्या वडिलांना जिंकून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करु, असंही संभाजीराजे म्हणाले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड