विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२३ : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता उद्या, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयार पूर्ण केली आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
श्री. स्वामी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, टपालीमतपत्रिका नोडल अधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले की, मतमोजणीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेच्या आधी मतमोजणी केंद्रावर उपस्थित रहावे. मतदान यंत्रे स्ट्राँगरूममधून बाहेर आणण्याआधी कुलूप सिल उघडताना निवडणूक निरीक्षक, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आवश्यक ती पारदर्शकता जपता येते. मतमोजणी केंद्रावरील संवाद प्रणाली ही अद्ययावत व सुसज्ज ठेवावी. विद्युत पुरवठा अखंड ठेवण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पथक सज्ज ठेवावे. मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या तरतुदींचा अभ्यास करा. मतमोजणी कक्षात शांतता राखायला हवी. टपाली मतपत्रिकांची मोजणीने सुरुवात करा. मतमोजणी केंद्रावर अद्ययावत आरोग्य केंद्र सुसज्ज ठेवा. १०० मीटर कक्षेच्या आत वाहनांना परवानगी नाही. याबाबत दक्षता घ्यावी. मतमोजणी प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने राबवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
मतमोजणी केंद्राची ठिकाणे
सिल्लोड : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवे, सिल्लोड
कन्नड : इनडोअर हॉल, शिवाजी महाविद्यालय, कन्नड, ता. कन्नड
फुलंब्री : गरवारे हायटेक फिल्म्स लि. चिकलठाणा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर मध्य : शासकीय तंत्रनिकेतन , रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर पश्चिम : शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर पूर्व : सेंट फ्रान्सीस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर
पैठण : प्रशासकीय इमारत, संतपीठ, जायकवाडी धरणाजवळ, पैठण
गंगापूर : इनडोअर स्टेडियम हॉल, श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर, ता. गंगापूर
वैजापूर : टेनिस कोर्ट हॉल, विनायक पाटील महाविद्यालय, येवला रोड, वैजापूर
अशी केली तयारी…
इव्हीएमसाठी १२६ टेबल असतील. टपली मतपत्रिकांसाठी ७० टेबल असतील तर ईटीपीबीएससाठी १२ टेबल असतील, अशी माहिती देण्यात आली. ८५२ मतमोजणी कर्मचारी, २४२ सूक्ष्म निरीक्षक व ३००० पोलीस कर्मचारी असे ५७७८ मनुष्यबळ मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदारसंघनिहाय होणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्या अशा…
सिल्लोड-२९, कन्नड-२७, फुलंब्री-२७, औरंगाबाद मध्य-२३, औरंगाबाद पश्चिम -२८, औरंगाबाद पूर्व-२४, पैठण-२६, गंगापूर-२७, वैजापूर-२६. मतमोजणी कालावधीत व मतमोजणी नंतरही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा बलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात गस्त, ड्रोनद्वारे, सीसीटीव्हीद्वारे गस्त वाढविण्यात आली आहे. सद्यस्थितीत ६ केंद्रीय बल गट तर २ राज्य राखीव पोलीस बल गट जिल्ह्यात तैनात आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली.
हे आदेश पाळावेच लागणार…
मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याअन्वये मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्राधिकृत व्यक्तींव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास, मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना लागू राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात मोबाईल, टॅब, संगणक व तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या विद्युत उपकरणे बाळगण्यास व हाताळण्यास मनाई, अनधिकृत व्यक्तीच्या प्रवेशास मनाई करण्यात आली असून या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
			












