विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२६ : विधानसभा निवडणूक संपली असली तरी अद्याप गावागावात खुमखुमी कायम आहे. मतदान कुणाला केले, यावरून संशयाच्या नजरा एकमेकांवर असून, यातून पिंप्री राजा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे एका कुटुंबावर १६ जणांनी सशस्त्र हल्ला चढविला. यात तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास घडली.
सुरेश डिगांबर जाधव, अमोल सुरेश जाधव, उमेश सुरेश जाधव (रा. पिंप्री राजा) अशी गंभीर जखमींची नावे असून, राहुल सुरेश जाधव (रा. पिंप्री राजा) असे जखमीचे नाव आहे. करमाड पोलिसांनी १६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात कैलास रामदास जाधव, विशाल रामभाऊ जाधव, राजू हरिभाऊ जाधव, रामदास तुकाराम जाधव, विलास रामदास जाधव, प्रभू रामदास जाधव, विठ्ठल रामभाऊ जाधव, प्रकाश शंकर जाधव, आकाश प्रकाश जाधव, विकास प्रकाश जाधव, सखाराम मारोती जाधव, करण प्रकाश जाधव, छोटू हरिभाऊ जाधव, हरिभाऊ तुकाराम जाधव, किशोर शंकर जाधव, अर्जुन सखाराम जाधव (सर्व रा. पिंप्रीराजा) यांचा समावेश आहे.
राहुल सुरेश जाधव (वय २६, रा. पिंप्री राजा, ता. छत्रपती संभाजीनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की तो मोलमजुरी करतो. वडील सुरेश डिगांबर जाधव, भाऊ अमोल व उमेश, आई बहिणाबाई जाधव यांच्यासह राहण्यास आहे. शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामावरून गावात आला असता चहा घेण्यासाठी राजू घोडके यांच्या हॉटेलवर गेला. तिथे गावातील राजू हरिभाऊ जाधव होता. तो राहुलला म्हणाला, की तू कुणाला मतदान केले? त्यावर राहुल त्याला म्हणाला की, मी कोणालाही मतदान करेल. तुला काय करायचे. त्यावर त्याने उद्घट भाषेत बोलून शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे दोघांत शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर राहुल घरी निघून आला व भावाला घडलेली घटना सांगितली.
रात्री आठच्या सुमारास राहुलच्या भावाने राजूला वाद का घातला, अशी विचारणा केली. त्याचवेळी कैलास रामदास जाधव, विशाल रामभाऊ जाधव, राजू हरिभाऊ जाधव हेही जमले. राहुलचा भाऊ अमोल त्यांना बोलत असताना विशाल जाधव व राजू जाधव यांनी अमोलला मारहाण सुरू केली. त्यामुळे राहुल पळत आला व भांडण सोडवू लागला. याचवेळी कैलास रामदास जाधव याने त्याच्यासोबत आणलेल्या चाकूने अमोलच्या पाठीवर, मांडीवर व डाव्या हातावर वार केले. यात अमोल गंभीर जखमी झाला. त्याला वाचविण्यासाठी राहुल, त्याचे वडील सुरेश डिगांबर जाधव, भाऊ उमेश सुरेश जाधव हे धावले असता रामदास तुकाराम जाधव याने त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकली. प्रभू रामदास जाधव याने त्याच्या हातातील लाकडी काठीने उमेशच्या डोक्यात व अंगावर मारहाण केली. उमेशचे डोके फुटले.
विठ्ठल रामभाऊ जाधव याने त्याच्या हातातील लाकडी काठीने राहुलच्या वडिलांवर वार केले. तेही जखमी झाले. राजू हरिभाऊ जाधव याने त्याच्या हातात लाकडी काठी घेऊन राहुलला बेदम मारहाण केली. तिन्ही भाऊ आणि त्यांचे वडील जखमी होऊन जमिनीवर कोसळल्यानंतर प्रकाश शंकर जाधव, आकाश प्रकाश जाधव, विकास प्रकाश जाधव, सखाराम मारोती जाधव, करण प्रकाश जाधव, छोटू हरिभाऊ जाधव, हरिभाऊ तुकाराम जाधव, किशोर शंकर जाधव, अर्जुन सखाराम जाधव या सर्वांनी त्यांना शिवीगाळ करत चापट, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरूच ठेवली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी धावून राहुल व त्याच्या कुटुंबीयांची सुटका केली व करमाडच्या सरकारी रुग्णालयात सर्वांना दाखल केले. अमोल, उमेश व त्यांच्या वडिलांना जास्त मार लागलेला असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. राहुलचे भाऊ अमोल जाधव, उमेश जाधव व वडील सुरेश जाधव यांच्यावर वॉर्ड क्र.११ येथे उपचार सुरू आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दगडू तडवी करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
			












