बीड : वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आपल्याला बीड कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप आता महादेव गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी केला आहे. या प्रकरणी कारागृहाचे सीसीटीव्ही तपासण्यात यावेत आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तशा आशयाचं पत्र महादेव गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी बीड कारागृहाच्या अधीक्षकांना लिहिले आहे.
परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येचे आरोपी असलेले बबन गित्तेचे सहकारी आधीपासूनच बीडच्या जिल्हा कारागृहात होते. त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी देखील याच कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. मात्र काही दिवसातच वाल्मिक कराडचे सहकारी असलेले सुदर्शन घुले आणि बबन गित्तेचे याचे सहकारी महादेव गित्ते यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली. त्यानंतर महादेव गित्ते आणि त्याच्या सहकाऱ्यांना इतरत्र जेलमधे हलवण्यात आले. मात्र आता आपल्यालाच मारहाण झाल्याचे पत्र कारागृह प्रशासनाला देत महादेव गित्ते याने सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार देखील सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. इतकंच नाही तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील या व्हीआयपी ट्रीटमेंट बाबत माध्यमांसमोर वक्तव्यं केली होती. तसेच कारागृहातील सीसीटीव्ही बंद असल्याचे देखील यावेळी समोर आले होते. त्यानंतर पुन्हा बीड जिल्हा कारागृहात हाणामारीचा प्रकार झाल्यानंतर कारागृहाचा आका देखील वाल्मिक कराडच असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
31 मार्च रोजी फोन लावण्यासाठी बराक मधून आरोपींना बाहेर काढले गेले होते. यावेळी वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते या दोघांत शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली होती. परंतु कारागृह प्रशासनाने कराडचा काहीच संबंध नसल्याचे सांगत राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यात वाद झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल केला.
त्यानंतर गित्ते आणि आठवले गँगच्या सदस्यांना इतरत्र जेलमध्ये हलवण्यात आले. मात्र वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहात आम्हाला मारहाण केल्याची तक्रार महादेव गित्ते, राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महादेव गित्ते यांनी कारागृह अधीक्षकांकडे केल्याने कारागृहात गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झाला होता हे सिद्ध झाले असेच म्हणावे लागेल.
तू सध्या जेलमध्ये आहेस म्हणून वाचलास नाहीतर तुझे हाल संतोष देशमुख याच्यापेक्षा वाईट करून तुम्हाला मारलं असत अशी धमकी महादेव गित्तेला जेलमध्ये दिल्याची माहिती त्याची पत्नी मीरा गित्ते हिने दिली. वाल्मिक कराडला जेलमध्ये ज्या सुविधा मिळत आहेत त्याला गित्ते विरोध करत होता. म्हणूनच हा मारहाणीचा प्रकार झाला आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, रघुनाथ फड,बालाजी दहिफळे, हैदर अली,लईक अली, योगेश मुंडे, जगन्नाथ फड आणि त्याच्या साथीदारांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचे महादेव गित्ते याने आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असून जेलमधील मारहाणीच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार असल्याचे गित्तेच्या पत्नीने सांगितले आहे.
वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यात दहशत होती. याबाबतच्या अनेक घडामोडी गेल्या तीन महिन्यात समोर आल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच आका आहे असे भाजपचे आमदार सुरेश धस वारंवार सांगत आले आहेत. त्यातच बीडमध्ये विविध गँगच्या वर्चस्वाच्या लढाया आधी कारागृहाच्या बाहेर सुरू होत्या. आता कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीच्या या प्रकरणानंतर ही वर्चस्वाची लढाई आता कारागृहात देखील सुरू असल्याचे दिसून येत आहेत.