Maharashtra on High Alert : भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्ताननं आज रात्री जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब राज्यातील विविध भागात ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानाद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम S-400 नं पाकिस्तानच्या ड्रोन मिसाईल आणि लढाऊ विमान पाडण्यात यश मिळवलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलिस अधिक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, उप महानिरीक्षकांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. (India Attack On Pakistan)
आपल्या हद्दीतील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे, सागरी हद्द या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थाच्या दृष्टीने आवश्यकत्या उपाय योजना करणे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादी कडून देशातील महत्वाच्या स्थळांना दहशतवादी कडून लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.
मुंबई पोलिसांना नव्या सुट्ट्या देण्यास मनाई
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पोलिसांना नव्यानं सुट्ट्या न देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्व राज्यातील पोलीस अलर्टवर आहेत. मुंबई पोलीस देखील हाय अलर्ट असून यामुळं मुंबई पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कोणत्याही रँकच्या अधिकाऱ्याच्या सुट्ट्या मंजूर होणार नाहीत.
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार हा निर्णय कायमस्वरुपी नसून परिस्थिती बदलल्यास त्यानुसार बदल केला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या पोलिसाच्या घरी काही आपत्कालीन परिस्थिती असल्यास त्यांना नव्यानं सुट्टी दिली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी ज्या पोलिसांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, त्यांची सुट्टी रद्द करण्यात आलेली नाही किंवा त्यांना परत बोलावण्यात आलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सर्व पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात राहण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय पोलिसांना स्थितीवर लक्ष ठेवून राहण्यास सांगण्यात आलं आहे.