नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर, निवडणुकीनंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्ध आणखी तीव्र होण्याचा अंदाज जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने वर्तवला आहे. अमेरिकेने चीनवरील धोरणात्मक क्षेत्रात गुंतवणूक करण्यावर बंदी घातल्यापासून जागतिक कंपन्या चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्याचा फायदा भारत तसेच आसियान देशांना होऊ शकतो. अमेरिकेचे हे पाऊल चीनवर दुहेरी हल्ल्यासारखे असेल.
जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थेतील वाढत्या व्यापार युद्धामुळे भारताला निर्यात वाढवून अमेरिकन कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. तसेच यामुळे चीनचे दुहेरी नुकसान होईल. एकीकडे परकीय गुंतवणुकीत घट झाल्यामुळे ड्रॅगनची अर्थव्यवस्थेचा वेग मंदावेल तर दुसरीकडे प्रमुख प्रतिस्पर्धी भारतातील बड्या कंपन्यांचा वाढता स्वारस्य ड्रॅगनला कोणत्याही प्रकारे पसंत पडणार नाही. अशा स्थितीत, मूडीजने म्हटले की अमेरिकेचा कमी झालेला व्यापार आणि चीनकडून होणारा विदेशी गुंतवणुकीचा ओघ भारताला फायदा मिळवून देऊ शकतो.
“भारत आणि ASEAN देशांना या बदलाचा फायदा होईल पण अमेरिकेच्या अधिक कठोर उपायांनी चीनची निर्यात आणि जीडीपी वाढ कमी केली, तर त्याचा परिणाम आशिया-पॅसिफिक (APAC) क्षेत्राच्या अर्थव्यवस्थांवर होईल जे चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, असेही मूडीजने म्हटले.”