नांदेड दि.२३ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे पूरग्रस्तांच्या अनुषंगाने विविध मागण्यासाठी मागील दीड वर्षांपासून साखळी उपोषण सुरु आहे.
जिल्हा संकेत स्थळावर प्रसिद्ध केलेली बोगस यादी रद्द करून शासन आदेशाचे उल्लंघन करून ज्यांनी यादी तयार केली त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी म्हणून आक्रमक आंदोलने सुरु आहेत. त्या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.२३ मार्च रोजी शहीद दिन आंदोलनाच्या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी शहीद भागतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने आणलेले विशेष जनसुरक्षा बील या ठिकाणी जाळून लोकशाही व जन विरोधी असलेल्या या बीलाची होळी करण्यात आली.
यावेळी राज्य व केंद्र सरकार, तसेच नांदेड महापालिका, नैसर्गिक आपत्ती विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
अभिवादन कार्यक्रमामध्ये माकप सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आयोजन डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) तालुका कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. कॉ.जयराज गायकवाड, कॉ. सुभाषचंद्र गजभारे, कॉ.सूरज सरोदे, कॉ.नवनाथ सावंत,कॉ. चंद्रशेखर गायकवाड,कॉ.मंगेश वट्टेवाड आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड