Narendra Modi : गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरमध्ये माधव नेत्र रुग्णालयाची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी जाहीर सभेच्य सुरुवातीला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विविध सण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवासाच्या 100 व्या वर्षाबद्दल देशवासियांना संबोधित केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण मराठीत सुरू केले. यासोबतच नवरात्रोत्सवाच्या प्रारंभाचा उल्लेख करत त्यांनी सर्व सणांच्या शुभेच्छा दिल्या आणि देशाच्या सांस्कृतिक विविधतेवर प्रकाश टाकला. याशिवाय, भगवान झुलेलाल आणि गुरु अंगद देव यांच्या जयंतीचा उल्लेख देखील केला.
भारताची सर्वात मोठी संपत्ती ही आजचे तरूण आहेत. भातातील तरुणांमध्ये आत्मविश्वास आहे. त्यामुळे हे तरुण 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाचा झेंडा हाती धरतील असं मोदी म्हणाले. देशातील सर्व नागरिकांना चांगल्या प्रकरची आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे ही आमची प्राथमिकता आहे. तसेच देशातील सर्वात गरीब व्यक्तीलाही सर्वोत्तम उपचार मिळाले पाहिजेत. कोणताही नागरिक वंचित राहू नये. देशासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या वृद्धांना उपचाराची चिंता नसावी हे धोरण सरकारचे आहे. त्यामुळेच आम्ही आज आयुष्यमान भारतमुळे कोट्यवधि लोकांना मोफत उपचारांची सुविधा देत आहोत.
पुढे मोदी म्हणाले की, जर आपण आपल्या देशाच्या इतिहासावर नजर टाकली तर आपण शेकडो वर्षे गुलामगिरीत जगलो. इतके हल्ले झाले. भारताची सामाजिक रचना नष्ट करण्याचे देखील अनेकदा प्रयत्न झाले. परंतु भारताची जाणीव कधीच संपली नाही. सर्वात कठीण काळातही आपल्या संतांनी भक्तीच्या कल्पनांनी आपल्या राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा दिली.
जगात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तरी भारत हा पूर्ण समर्पणाने सेवेसाठी उभा राहतो. म्यानमारमध्ये इतका मोठा भूकंप झाला आहे. ऑपरेशन ब्रह्याच्या माध्यमातून भारत तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी सर्वात आधी पोहोचला. जेव्हा नेपाळमध्ये भूकंप झाला. मालदीवमध्ये पाण्याचे संकट आले, तेव्हा देखील सर्वात प्रथम भारताने मदत केली असं मोदी म्हणाले.