नांदेड दि .७ डिसेंबर: सक्षम ताटे हत्याकांडानंतर पीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी समाज कल्याण विभाग पुढे सरसावला असून मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. विभागाकडून सक्षम ताटेच्या कुटुंबाला एकूण 8 लाख 25 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी 4 लाख 12 हजार 500 रुपये इतका पहिला हप्ता कुटुंबाच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असून उर्वरित रक्कम चार्जशीट दाखल झाल्यानंतर देण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
२७ नोव्हेंबर रोजी मिलिंद नगर परिसरात सक्षम ताटे (वय 20, संघसेन नगर, इतवारा) याचा प्रेयसी आचल मामीडवारच्या कुटुंबियांनी विरोधाच्या पार्श्वभूमीवर निर्घृण खून केला होता. तिला मागील तीन वर्षांपासून सक्षमसोबत प्रेमसंबंध होते; मात्र मुलीच्या घरच्यांचा या नात्याला तीव्र विरोध होता.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून त्यामध्ये आचलची आई जयश्री गजानन मामीडवार, वडील गजानन बालाजी मामीडवार, भाऊ साहिल गजानन मामीडवार, सोमेश सुभाष लखे, वेदांश अशोक कुंदेकर उर्फ कुलदेवकर, अमन देविदास शिरसे आणि एक अल्पवयीन आरोपी यांचा समावेश आहे.
समाज कल्याण विभागाच्या या निर्णयामुळे सक्षम ताटेच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून प्रकरणाच्या पुढील तपासावर सर्वांचे लक्ष आहे.











