Tahawwur Rana Extradition From US: 26/11 मुंबई हल्ल्यामध्ये जवळपास 174 निष्पापांचा बळी गेला आणि या मृत्यूचं थैमान पाहून एका काळीज नसलेल्या क्रूरकर्म्यानं हसत व्यक्त होणं पसंत केलं होतं, तो म्हणजे या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा. अनेक प्रयत्नांनंतर अखेर मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भ्याज हल्ल्याचा कट रचणाऱ्या या तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी रात्री पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर करण्यात आलं.
विमानतळावर आल्यानंतर राणाला जवळपास अडीच तासानंतर न्यायालात आणण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यावेळी एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसाची कोठडी मागितली. राणाच्या कोठडीची कारणंही वकिलांनी कोर्टासमोर मांडली. शिवाय राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला 18 दिवसाची कोठडी दिली. सदर सुनावणीच्या वेळी कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर अमेरिकेनंही पहिली प्रतिक्रिया देत या लढ्यातील आपली भूमिका स्पष्ट केली. 9 एप्रिल रोजी आपल्या देशातून राणाला संपूर्ण प्रक्रियेसह भारताच्या ताब्यात देण्यात आलं असं सांगताना दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्र तत्पर आणि कटिबद्ध असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.
अमेरिकेच्या वतीनं टॅमी ब्रूस यांनी ही प्रतिक्रिया वृत्तसंस्थेला देत अमेरिकेनं कायमच दहशतवादाशी लढण्याच्या भारताच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं. ‘जसं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात, अमेरिका आणि भारत ही दोन्ही राष्ट्र जागतिक स्तरावर दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी सदैव एकत्र काम करत राहतील. ‘तो’ (राणा) त्यांच्या ताब्यात असून, आमच्यासाठी ही बाब अतिशय अभिमानाची आणि महत्त्वपूर्ण आहे’, असं ही ब्रूस यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान एनआयएकडून आता राणाची सातत्यानं चौकशी केली जाणारस असून, 26/11 हल्ल्याशी संबंधित इतर सर्व गोष्टी आणि गुपितं उघड केली जाणार आहे. यंत्रणांनी तशी तयारीच केली असून, या चौकशीतून लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तनातील दहशतवाद्यांच्या तळांसह त्यांची कटकारस्थानं यामुळं उघड्यावर पडतील असा विश्वासही व्यक्त केला जात आहे