नांदेड दि.२०: सिडको मोंढा येथे रस्त्याचे काम तात्काळ करावे व या भागाला महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी मनपा आयुक्त आणि आमदार आनंदराव बोंढारकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील राज अपार्टमेंट ई फ्लॅट क्रं २०१ सिडको मोंढा नांदेड येथे अनेक कुटूंबं वास्तव्यास आहेत. निवेदनकर्ता सूर्यभान कागणे हे नांदेड पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जनसंपर्क विभागात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे ते दिव्यांग असून त्यांचे जांगेपासुन दोन्ही पाय गंभीर अपघातात तुटले आहेत. अशा परिस्थीतीत ते व इतर दिव्यांग बांधव सिडको मोंढा येथुन दिव्यांगाच्या स्कुटीवर कर्तव्याकरीता येणे जाणे करीत असतात.
मनपा तर्फे सिडको मोंढा भागातील संपूर्ण रस्ते खोदुन ड्रेनेज पाईप टाकण्यात आली आहेत. परंतु सिमेंट रोड व नळ योजना चालू करण्यात आली नाही. रोड खोदल्यामुळे मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच ड्रेनेजचे चेंबर उघडे पडलेले आहेत. ड्रेनेज फुटल्यामुळे पाणी रस्त्यावर येवुन वाहने स्लीप होत आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री जातांना ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून एखादी प्राणहाणीसारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
तसेच या भागात पाईप लाईन झालेली आहे. परंतु अद्याप नळाला पाणी सोडण्याची व्यवस्था झालेली नाही. नळाला पाणी देत नाही, रस्ते बरोबर नाहीत. पण नळ पट्टी, घर पट्टीची देयके मात्र मनपाकडून नियमीत दिल्या जात आहे.
सध्या सिडको मोंढा भागातील संपूर्ण सिमेंट रस्ते व नळाला पाणी सोडणे ही कामे लवकर करावीत, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी आ. आनंदराव बोंढारकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या भागात दिव्यांग अधीकारी, कर्मचारी, तसेच इतर दिव्यांग व्यक्ती सुध्दा राहात असतात. पाऊस पडल्यास दिव्यांग व्यक्तींना अतिशय तातडीच्या प्रसंगी दवाखान्यात उपचाराकरीता सुध्दा जात येत नाही.आता कांही दिवसात उन्हाळा सुरु होणार आहे. उन्हाळ्यात जमिनीतील पाणी पातळी कमी होत असते. अशा वेळी बोरला पाणी येत नाही. पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आमच्या सारख्या दिव्यांग व्यक्तीची खुप मोठी अडचण निर्माण होत आहे. सिडको मोंढा भागातील सर्व समस्या सोडविण्यात याव्यात, सिमेंट रस्ते बनविणे आणि नळाला पाणी सोडणे या समस्या लवकर सोडवाव्यात, अशी मागणी नवीन सिडको मोंढा भागातील रहिवाशांच्या वतीने करण्यात आली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड