मुंबई दि.३१ जानेवारी: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी आणि आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या अत्यंत कठीण प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कुटुंबाला धीर दिला असून, सरकार आणि पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “अजितदादांनी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पासाठी (Budget 2026-27) गेल्या काही महिन्यांपासून अथक परिश्रम घेतले होते. त्यांनी अर्थसंकल्पाचा मोठा आराखडा तयार केला होता. त्यांचे हे ‘अधुरे स्वप्न’ आणि अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे.” फडणवीस पुढे म्हणाले की, उद्यापासूनच ते स्वतः अर्थसंकल्पाच्या कामात लक्ष घालणार असून, अजितदादांनी ठरवलेल्या नियोजनानुसारच राज्याचा गाडा पुढे नेला जाईल.
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. “पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. अजितदादांच्या कुटुंबाचा किंवा त्यांच्या पक्षाचा जो काही निर्णय असेल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
राज्याच्या विकासात अजित पवार यांचे योगदान मोठे असल्याचे सांगत, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. आगामी अर्थसंकल्प आता मुख्यमंत्री स्वतः मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.













