पुणे दि २७ जानेवारी : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याला हादरवणारी एक संतापजनक घटना उरुळी कांचन परिसरातील सोरतापवाडी येथे घडली आहे. हुंड्यासाठी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ तसेच वंशाला दिवा हवा म्हणून केलेला जबरदस्तीने गर्भपात, या जाचाला कंटाळून दीप्ती रोहन चौधरी (वय ३०) या उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय? सोरतापवाडी (ता. हवेली) येथे २५ जानेवारीच्या रात्री दीप्ती चौधरी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीप्ती या कॉम्प्युटर इंजिनिअर होत्या. लग्नात ५० तोळे सोने आणि ३५ लाख रुपये हुंडा देऊनही सासरच्या मंडळींची हाव थांबली नव्हती. माहेरहून चारचाकी गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये आणावेत आणि वडिलांच्या व्यवसायात तसेच रो-हाऊस स्कीममध्ये हिस्सा मागावा, यासाठी दीप्ती यांचा सतत छळ केला जात होता.
सरपंच सासू आणि शिक्षक सासऱ्यांचे कृत्यू विशेष म्हणजे या प्रकरणातील सासू सुनिता चौधरी या सोरतापवाडीच्या सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी हे पेशाने शिक्षक आहेत. समाजात प्रतिष्ठा असलेल्या या कुटुंबात सुनेचा अमानुष छळ झाल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. दीप्ती यांना पहिली मुलगी असल्याने, दुसऱ्या वेळी गर्भलिंग निदान चाचणी करण्यास भाग पाडले गेले. पोटात मुलगी असल्याचे समजताच सासरच्यांनी दीप्ती यांची इच्छा नसतानाही जबरदस्तीने त्यांचा गर्भपात केल्याचा गंभीर आरोप दीप्ती यांच्या आईने तक्रारीत केला आहे.
चौघांवर गुन्हा दाखल याप्रकरणी दीप्ती यांच्या आई हेमलता बाळासाहेब मगर (रा. हडपसर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती रोहन कारभारी चौधरी, सासू सुनिता कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित कारभारी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













