मुंबई : ‘धडक 2’ चित्रपटात नीलेशची भूमिका साकारून प्रेक्षक व समीक्षकांची प्रशंसा मिळवणाऱ्या अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला अलीकडेच पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र हा सन्मान स्वीकारताना सिद्धांतने तो स्वतःपुरता मर्यादित न ठेवता, नांदेडमधील प्रेमप्रकरणावरून घडलेल्या जातीय द्वेषातून बळी ठरलेल्या दिवंगत सक्षम ताटे यांना समर्पित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मंचावरून सक्षम ताटे यांना श्रद्धांजली अर्पण करत सिद्धांतने अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा संदेश दिला. तो म्हणाला,
“हा पुरस्कार फक्त माझा नाही. जातीय भेदभाव, बहिष्कार आणि दुय्यम वागणूक सहन करणाऱ्या प्रत्येकाच्या जिद्दीचा हा सन्मान आहे. परिस्थिती प्रतिकूल असतानाही उभं राहण्याचा आणि लढण्याचा अधिकार त्यांनी कमावला आहे. हीच जिद्द मला सलाम करायला लावते. त्यामुळे हा पुरस्कार मी सक्षम ताटेला समर्पित करतो.”
यानंतर सिद्धांतने ‘धडक 2’च्या दिग्दर्शिका शाझिया इकबाल यांचे विशेष आभार मानले.
“प्रत्येक वादळातून त्यांनी चित्रपटाला सावरले,” असे तो म्हणाला. तसेच लेखक राहुल बडवेलकर यांच्या कथनशैलीचे कौतुक करत,
“या कथेतल्या शांततेला त्यांनी खऱ्या अर्थाने आवाज दिला,” असेही त्याने नमूद केले.
सिद्धांतने आपल्या गौरवाच्या क्षणाचा वापर सामाजिक वास्तवाला आवाज देण्यासाठी करत दिलेला संदेश स्पष्ट होता —
‘धडक 2’सारख्या कथा धैर्याने, संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे सांगितल्या जाणे आवश्यक आहे.
सिद्धांतच्या आगामी प्रकल्पांविषयी बोलायचे झाल्यास, त्याचा पुढील चित्रपट ‘दो दीवाने शहर में’ येत्या 20 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. यात तो अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत प्रथमच 90 च्या दशकातील एक अनोखी प्रेमकथा साकारताना दिसेल.













