आज ‘फादर्स डे’ अर्थात पितृदिन. सोशल मीडिया उघडला की बाबांसोबतचे सुंदर फोटो, स्टेटस आणि शुभेच्छांचा पाऊस पडताना दिसतोय. पण या सगळ्या भाऊगर्दीत मला नेहमी एक प्रश्न पडतो… खरंच ‘बाप’ नावाचं हे माणूस एका दिवसाच्या स्टेटसमधून समजून घेता येण्यासारखं आहे का? याचं उत्तर आहे- नक्कीच नाही. कारण आई जर घराचं मांगल्य असेल, तर बाप त्या घराचं अस्तित्व असतो.
आईच्या प्रेमावर जगात हजारो कविता लिहिल्या गेल्या, गाणी बनली. आईचं प्रेम हे उघड असतं, ते लगेच डोळ्यांत दिसतं. पण बापाचं प्रेम मात्र नारळासारखं असतं; वरून कडक, पण आतून तितकंच मऊ आणि गोड. आपल्या कुटुंबाला कोणतीही झळ पोहोचू नये म्हणून जो स्वतः उन्हातान्हात राबतो, पण घरापर्यंत पोहोचताना मात्र चेहऱ्यावर सुखाची सावली घेऊन येतो, तो म्हणजे ‘बाप’.
लहानपणी आपण जेव्हा सायकल चालवायला शिकतो, तेव्हा मागून सायकल घट्ट धरणारा आणि “पडू नकोस, मी आहे ना मागे…” असा खंबीर विश्वास देणारा हात बापाचाच असतो. आपण मोठे होतो, स्वतःच्या पायावर उभे राहतो, तेव्हा तो हात नकळत मागे सुटतो. पण गंमत बघा, तो हात प्रत्यक्ष मागे सुटला तरी त्या हाताने दिलेला ‘विश्वास’ आयुष्यभर आपल्यासोबत राहतो. म्हणूनच, अपयशाच्या मोठ्या वादळातही जेव्हा एखादा तरुण खंबीरपणे उभा राहतो, तेव्हा त्या मागे त्याच्या बापाने दिलेली हिंमत असते.
बाप कधी उघडपणे रडत नाही. मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायचं असतं, तेव्हा फीचे पैसे भरताना त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्यांमध्ये त्याचं प्रेम दडलेलं असतं. स्वतःचे फाटलेले बनियान किंवा वर्षानुवर्षे तोच जुना शर्ट वापरून मुलाला सणावारी नवीन कपडे घेताना जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो, त्या त्यागात त्याचं प्रेम असतं. ‘सत्यप्रभा न्यूज’च्या माध्यमातून आज मला सर्व वाचकांना हेच सांगाव आहे की, आपल्या आईइतकाच बापाचा संघर्षही मोठा असतो, फक्त तो मोजता येत नाही.
आजच्या या आधुनिक युगात आपण खूप पुढे गेलोय. पण एका गोष्टीची खंत वाटते, वय वाढतं तसं मुलांचं आणि वडिलांचं बोलणं कमी होतं. “बाबा कसे आहात?” हा एक साधा प्रश्न विचारायलाही आपल्याला संकोच वाटतो. आज या पितृदिनाच्या निमित्ताने हा संकोच बाजूला सारूया.
फक्त सोशल मीडियावर फोटो टाकून हा दिवस साजरा करण्यापेक्षा, आज प्रत्यक्षात बाबांच्या जवळ जाऊन बसा. त्यांचा तो थकलेला, कष्टाने रापलेला हात आपल्या हातात घ्या आणि त्यांना सांगा- “बाबा, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही आमच्यासाठी जे केलंत, त्याची किंमत जगात कशानेच होऊ शकत नाही.” विश्वास ठेवा, तुमच्या या एका वाक्याने त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान येईल, ते जगातल्या कोणत्याही महागड्या गिफ्टपेक्षा खूप मोठं असेल.
स्वतः झिजून आमच्या स्वप्नांना आकाश देणाऱ्या जगातील सर्व ‘बापांना’ आणि त्यांच्या कष्टाला माझा मानाचा मुजरा!