विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२०: घरातील सिलिंडरमधून गॅसगळती होऊन अचानक भडका उडाला. या भडक्यात महिलेसह तिच्या दोन्ही मुली सापडून तिघीही भाजून गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना विमानतळाजवळील मूर्तिजापूरमध्ये शनिवारी (१९ एप्रिल) सायंकाळी ७ वाजता घडली.
रंजना किसन चव्हाण (४०), त्यांची मुलगी ज्योती (१९) व त्रिशा (९) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्याशिवाय लताबाई कुंडलिक साळवे (वय ४६) याही गंभीर जखमी झाल्या आहेत. किसन चव्हाण टॅक्सी व्यावसायिक असून, ते चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनीत राहतात. पुतणीचे लग्न असल्याने शनिवारी दिवसभर ते तयारीत व्यस्त होते. त्यांची पत्नी रंजना, मुली ज्योती व त्रिशा सायंकाळी घराबाहेर गप्पा मारत असताना त्रिशाला गॅसचा वास आल्याने तिने आईला सांगितले. तिघी घरात जाताच अचानक भडका उडाला. स्वयंपाकघर व समोरील खोलीतील खिडक्यांच्या काचा फुटल्या. पडदेही पेटले. त्रिशा व ज्योती घराबाहेर पळत आल्या. त्रिशाची पॅण्ट पेटलेली होती.
नागरिकांनी धावून तिला विझवले. ज्योतीचा हात मोठ्या प्रमाणावर भाजला गेला होता. रंजना दरवाजातच कोसळल्या. सिडको एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. तिघींना घाटी रुग्णालयात दाखल केले असून, तिघीही ४० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्या गेल्या आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घराचा मुख्य दरवाजा तुटून २० फूट उडत अंगणात बसलेल्या लताबाई कुंडलिक साळवे यांच्या डोक्यात पडून त्याही जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घरातील दोन सिलिंडरला काही झालेले नाही. सर्व विद्युत स्विचसुद्धा सुस्थितीत आहेत. फ्रिजचे कॉम्प्रेसर स्थिर आहे. त्यामुळे स्फोटाबद्दल कुतूहल वाढले आहे. नेमका निष्कर्ष फॉरेन्सिक विभागाकडूनच कळू शकणार आहे
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!