तुषार कांबळे । हदगाव प्रतिनिधी | हदगाव | शहरातील तहसील व पंचायत समिती परिसरात असलेल्या आधार सुविधा केंद्रावर सर्वसामान्य नागरिकांकडून मनमानी पद्धतीने अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला व गोरगरीब नागरिकांकडून आधार अपडेट, नवीन आधार नोंदणी, ई-केवायसी, आधार लिंक, लॉक–अनलॉक आदी सेवांसाठी अधिकृत पावतीवर ‘झिरो अमाउंट’ दाखवून प्रत्यक्षात १३० ते १५० रुपये आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
हदगाव तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी तहसील परिसरात एकमेव आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र उपलब्ध असल्याचा गैरफायदा घेत केंद्र धारकांकडून बेकायदेशीरपणे अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडेही लेखी तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे.
आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक लुटीचे बळी ठरत आहेत. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित आधार केंद्र धारकावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच आधार सेवांसाठी शासनाने ठरवलेला अधिकृत शुल्क तक्ता केंद्रावर ठळकपणे लावण्याची मागणी नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.