दुर्गंधी मूळे प्रवाश्यांना होतो नाहक त्रास; आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता.
तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी !
## HIMAYATNAGER ## तालुक्यातील मौजे जवळगाव येथील रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे परिसरात प्रवास करणाऱ्यांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणाहून दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी ,स्थानिक नागरिक ये-जा करत असून या तीव्र दुर्गंधीमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पण हा दुर्गंधीयुक्त कचरा कोण हटविणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कचरा हटविण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. रेल्वे प्रशासन, ग्रामपंचायत की गाडी मालक अखेर या कचऱ्याची साफसफाई करणार कोण….? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने जनआक्रोश वाढत आहे.आरोग्य तज्ञांच्या मते, अशा प्रकारचा कुजका कचरा परिसरात ठेवला गेल्यास माशा, डास व जीवघेणे जीवजंतू वाढतात. यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना श्वसनविकार, फुफुसाचे रोग, त्वचारोग, संसर्गजन्य रोगांचा धोका संभवतो.स्थानिक समाजकार्यकर्त्यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने कचरा हटवून परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही बसवणे, दंडात्मक कारवाई करणे आणि नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रवाशांचे आरोग्य व सुरक्षितता अबाधित ठेवावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
चौकट:
” स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तीन ते चार दिवसांपूर्वी एक कचरा घेऊन जाणारी गाडी या मार्गाने जात होती परंतु रेल्वे पुला खालून जाताना उंची ची मर्यादा असल्याने तो कचरा तिथेच टाकून तिथून बाहेर पडण्याचा मार्ग काढला पण तो पडलेला दुर्गंधीचा कचरा काढण्याची गरज त्याला वाटली नाही. पण तो कचरा नेमका कुठून आला…? , कोण टाकून गेला…? याचा कोणालाही मागोवा लागत नाही. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिक, कुजलेले अन्न, जनावरांचे अवशेष, रासायनिक व घनकचरा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुर्गंधी इतकी तीव्र झाली आहे की , या रस्त्याने जाणारे प्रवासी त्या ठिकाणी नाक दाबूनच जात आहेत. विशेष म्हणजे याच मार्गावर माजी आमदार आणि विद्यमान खासदार यांचे गाव असल्याने दुर्गंधी युक्त कचरा टाकणारा कोण…? या कचऱ्याला कोणी वाली आहे की नाही याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी करू लागले आहेत…
## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##













