नवी दिल्ली : पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) क्रुर हल्ल्यात २८ पर्यटकांना प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. यानंतर केंद्र सरकारने आज पहलगाम घटनेवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सत्ताधारी मंत्री आणि खासदारदारांसह विरोधकही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटले ‘सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा असेल.'(Pahalgam Terror Attack)
आज सायंकाळी सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी उपस्थित नेत्यांना घटनेसंदर्भात तसेच भविष्यातील निर्णयाबाबत माहिती दिली. बैठक पार पडल्यानंतर राहुल गांधींनी सरकारला योग्य ती कारवाई करण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. गांधी म्हणाले, सर्वांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी विरोधी पक्षाने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनीही जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे म्हटले आहे. खर्गे म्हणाले, ‘ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या नेतृत्वात बैठक पार पडली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. सर्व पक्षांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. आम्ही म्हटले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत…”
दरम्यान तृणमुल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी नमूद केले की, ‘दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही सरकारसोबत आहोत. देशाने एकजुटीने याचा सामना केला पाहिजे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना संदेश दिला आहे.’