पुणे दि.२ फेब्रुवारी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या कराड शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्या कराडचे ग्रामदैवत आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करून करणार आहेत. कराडमधील कृष्णा-कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्या नतमस्तक होतील आणि आदरांजली अर्पण करतील. यशवंतराव चव्हाणांचा विकासाचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे चालवत असून, याच विचारांचा धागा पकडून सुनेत्रा पवार या प्रीतिसंगमावर दर्शनासाठी येत आहेत.
समाधी दर्शनानंतर सुनेत्रा पवार या कराडमधील आणखी एका महत्त्वाच्या भेटीसाठी जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक (PSO) म्हणून कार्यरत असणारे विदीप जाधव यांच्या निवासस्थानी त्या सदिच्छा भेट देणार आहेत. विदीप जाधव हे अजितदादांच्या सुरक्षा ताफ्यातील एक महत्त्वाचे आणि विश्वासू सदस्य मानले जातात. त्यांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन, सुनेत्रा पवार त्यांची आस्थेने विचारपूस करणार आहेत.
आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमातून वेळ काढत, सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका सामान्य कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करणे, यातून पवार कुटुंबीयांचा आपल्या सहकाऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. या भेटीदरम्यान त्या जाधव कुटुंबियांशी संवाद साधतील. कराडमध्ये या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.












