विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.११ :लाचखोर सहायक महसूल अधिकारी काशिनाथ आनंदा बिरकलवाड (वय ४१, रा. अजिंक्यतारा अपार्टमेंट, होनाजीनगर) हा अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात गुरुवारी (१० एप्रिल) रात्री ९ वाजता अडकला. वाळू तस्करीसाठी २ लाखांची लाच मागून त्याने १ लाख रुपये घेतले. जालना रोडवरील हॉटेल रामगिरीसमोरील सापळ्यात लाच घेताना तो रंगेहात पकडला गेला.
वाळू व्यावसायिक असलेल्या ३६ वर्षीय युवकाने या प्रकरणात एसीबीकडे तक्रार केली होती. बुधवारी (९ एप्रिल) रात्री त्याचा वाळू वाहतुकीचा एक हायवा बिरकलवाडने पकडला. वरिष्ठांच्या नावाने कारवाईचा इशारा देत कारवाई न करण्यासाठी त्याने आधी २ लाख रुपये मागितले. तडजोड होऊन १ लाख १० हजार रुपयांवर अंतिम व्यवहार ठरला. बुधवारी रात्री ११:३० वाजता त्याने ७० हजार रुपये जागेवरच घेतले. उर्वरित ४० हजार रुपये गुरुवारी देण्याचे ठरले. वाळू व्यावसायिकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांची भेट घेऊन तक्रार दिली. आटोळे यांनी पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांना तपासाचे आदेश दिले. बिरकलवाड लाच मागत असल्याची खात्री होताच दिंडे यांनी गुरुवारी रात्री सापळा रचला.
बिरकलवाडने वाळू व्यावसायिकाला हॉटेल रामगिरीसमोर ४० हजार रुपये घेऊन यायला सांगितले. तडजोडीअंती वाळू व्यावसायिकाने ३० हजार रुपये घेण्याची विनंती केली. पोलीस निरीक्षक केशव दिंडे हे सहकाऱ्यांसह हॉटेल रामगिरीजवळ दबा धरून बसले. बिरकलवाड दुचाकीवर येऊन उभा राहिला. ३० हजार रुपये त्याने स्वीकारताच वाळू व्यावसायिकाने रुमाल काढून घाम पुसला अन् इशारा मिळताच एसीबीच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याला पकडताच एसीबीचे दुसरे पथक त्याच्या होनाजीनगरच्या घरावर धडकले. रात्री उशिरापर्यंत घराची तपासणी आणि सिडको पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!