नांदेड दि.१३ डिसेंबर : देशातील वेगवान आणि अत्याधुनिक गाड्यांपैकी एक असलेली नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस तब्बल 40 मिनिटे ठप्प राहिल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. विशेष म्हणजे हा खोळंबा कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर रेल्वे ट्रॅकवर आलेल्या म्हशीला गाडीची धडक बसल्यामुळे झाला.
मंगळवार, दि. 9 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता, जालना स्थानकाजवळील मुक्तेश्वर तलाव परिसरातील गेटजवळ ही घटना घडली. मुंबईहून नांदेडकडे येणारी वंदे भारत एक्सप्रेस अचानक ट्रॅकवर आलेल्या म्हशीवर आदळली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की गाडीच्या नोज हेडला मोठे नुकसान झाले. तातडीने आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवण्यात आली.
अपघातानंतर गाडी ट्रॅकवरच उभी राहिल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ, मनस्ताप आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत गाडी सुमारे 40 मिनिटे उशिराने पुढे रवाना झाली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, हा मार्ग यापूर्वीही अशाच घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. 2024 मध्ये लासूर स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसला बैलाची धडक बसल्याची घटना घडली होती.
वारंवार प्राणी रेल्वे ट्रॅकवर येत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ट्रॅकजवळील कुंपण पुरेसे आहे का? जीआरपी व आरपीएफची गस्त प्रभावी आहे का? प्राणी ट्रॅकवर येऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत? असे अनेक प्रश्न प्रवासी आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनांमुळे प्राण्यांच्या जीवाला धोका, रेल्वेच्या महागड्या गाड्यांचे नुकसान आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एकाच वेळी समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणाकडे लक्ष वेधत, तुटकी कुंपणं आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
आता तरी रेल्वे प्रशासन ट्रॅकजवळील सुरक्षेबाबत ठोस पावले उचलणार का, याकडे प्रवासी आणि नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.












