Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagawane)आत्महत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या काही दिवसांपासून फरार असणारा निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याला अटक करण्यात आली आहे. सद्या समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळमधून निलेश चव्हाण याला अटक केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या राज्यात गाजत असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर आता पिंपरी – चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत निलेश चव्हाण याला देखील अटक केलीय. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, निलेश चव्हाण 23 मे पासून फरार होता.
चव्हाणच्या शोधासाठी 6 पथक रवाना करण्यात आली होती. अखेर चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून अटक केली असून, त्याला संध्याकाळपर्यंत भारतात आणले जाऊ शकते. चव्हाण याच्यावर वैष्णवी हगवणे मृत्यूनंतर कस्पटे कुटुंबीय बाळ घेण्यासाठी गेले असता त्यांनी बंदूक दाखवून धमकावले होते. त्याप्रकरणी त्याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.