पुणे दि.२७ जानेवारी : मातेचे हृदय हे सर्वात कोमल मानले जाते, परंतु पुण्यात या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वाघोली परिसरात एका जन्मदात्या आईनेच आपल्या ११ वर्षांच्या पोटच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी (२७ जानेवारी) सकाळी उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेत आरोपी महिलेने आपल्या १३ वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला असून ती गंभीर जखमी आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वाघोलीतील बायफ रोड (BAIF Road) परिसरातील एका हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली. सोनी संतोष जायभाय (वय अंदाजे ३५) असे आरोपी मातेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास सोनी यांनी त्यांचा मुलगा साईराज संतोष जायभाय (वय ११) आणि मुलगी धनश्री (वय १३) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला, तर धनश्री गंभीररीत्या जखमी झाली आहे.
रक्ताचा सडा आणि भयानक दृश्य हल्ला केल्यानंतर घरात आरडाओरडा झाल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यावेळी घरात रक्ताचा सडा पडला असल्याचे आणि अत्यंत भयानक दृश्य पाहण्यास मिळाले. आरोपी सोनी जायभाय या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील रहिवासी असून, त्या वाघोलीत पती आणि मुलांसह वास्तव्यास होत्या. घटनेच्या वेळी मुलांचे वडील संतोष जायभाय हे कामानिमित्त बाहेर गेले होते.
पोलिसांची कारवाई घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. जखमी मुलीवर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद किंवा मानसिक तणावातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.













