नवी दिल्ली : कर्नाटकमधील सत्ताधारी काँग्रेसमधील सत्ता संघर्ष सध्या शांत होताना दिसत आहे. कारण, पक्ष नेतृत्त्वानं उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. डी.के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धारामय्या गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांच्या काळात नवी दिल्लीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची बैठक राहुल गांधी यांच्यासोबत झाली.
डी.के. शिवकुमार यांना कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात यावं अशी मागणी केली जात होती.सिद्धारमय्या यांच्या गटातील काही आमदारांची आणि मंत्र्यांची मागणी डी.के. शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवावं अशी होती. एक व्यक्ती एक पद धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी त्या गटातील आमदारांची मागणी होती. कारण शिवकुमार हे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत. यामुळं पक्षातील त्यांचे स्पर्धक नेते शिवकुमार यांना पदावरुन हटवण्याची मागणी करत होते.
शिवकुमार यांच्यावर हायकमांडचा विश्वास
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रस हायकमांड डी.के. शिवकुमार यांना पदावरुन हटवण्याच्या मानसिकतेत नाही. कारण, ते कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी पक्षाला विधानसभा निवडणूक जिंकवून दिली होती . लोकसभेला आणि पोटनिवडणुकीत देखील चांगली कामगिरी केली होती. यामुळं डी.के. शिवकुमार यांच्यावर पक्षनेतृत्त्वाचा विश्वास आहे. काँग्रेसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस हायकमांड नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या मानसिकतेत नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळातील फेरबदल, विधान परिषद निवडणूक आणि आमदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न या संदर्भात चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्त्वानं विधानपरिषदेचे उमेदवार निवडण्याची जबाबदारी सिद्धारामय्या आणि शिवकुमार यांच्यावर दिली आहे.
राहुल गांधी कोणत्या गोष्टीमुळं नाराज?
कर्नाटकातील काँग्रेस आमदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा मुद्दा योग्य प्रकारे नं मांडण्यात आल्यानं राहुल गांधी नाराज झाले. राहुल गांधी यांच्या मतानुसार विधानसभेत या मुद्द्यावर चर्चा होण्याची गरज नव्हती. सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी हा मुद्दा कर्नाटक विधानसभेत मांडला होता. त्यांचा दावा होता की 48 आमदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं भाजप आणि जेडीएसला पराभूत करत सत्ता मिळवली होती. कर्नाटक विधानसभा निवडणूक राहुल गांधी यांची पहिली भारत जोडो यात्रा पार पडल्यानंतर झाली होती. त्या यात्रेचा फायदा कर्नाटक काँग्रेसला झाल्याचं दिसून आलं होतं.