बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्याचे काम सुरू
सातारा प्रतिनिधी | Satyaprabha News | सातारा (Satara News) शहरातील बुधवार नाका ते मोळाचा ओढा या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून दुरावस्था पाहायला मिळत होती. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वाहतुकीतील अडथळे आणि वाढलेल्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे (आबा) (Ganesh Waghmare) यांनी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नाला योग्य न्याय मिळवून दिला आहे.
आज सकाळपासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून, कामाची पाहणीही गणेश वाघमारे यांनी केली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी टाकणे, सपाटीकरण आणि तात्पुरता दुरुस्तीचा प्रारंभ प्रशासनाच्या पथकाने केला आहे. स्थानिक नागरिकांनीही या कामाचे स्वागत करत वाघमारे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सध्या तातडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून प्रथम तात्पुरती दुरुस्ती आणि नंतर पूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने तयार केला जाणार आहे. संपूर्ण रस्त्याचे काम लवकरच सुरू केले जाईल.”
या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने, ट्रक, दुचाकी, तसेच व्यावसायिक वाहतूक होते. त्यामुळे या दुरुस्तीचे काम ही तातडीची गरज बनली होती. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कामात विलंब होत होता. मात्र गणेश वाघमारे (आबा) यांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने हालचाल केली.