सातारा प्रतिनिधी | Satyaprabha News | गणेश वाघमारे | सातारा जिल्ह्यातील (Satara News) फलटण शहरात घडलेली (Phaltan News) एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना जिल्हाभरात खळबळ उडवून देणारी ठरली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून, डॉक्टरच्या हातावर पेनाने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये एका पोलिस निरीक्षकावर वारंवार बलात्काराचा आणि दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर मानसिक छळाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (Phaltan Satara Doctor Suicide Case)
संपूर्ण पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात —या घटनेनंतर संपूर्ण पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. आरोपी म्हणून ज्यांचं नाव समोर आलं आहे, ते स्वतः कायदा अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याने जनतेचा पोलिसांवरील विश्वास हादरला आहे. साताऱ्यासारख्या प्रगत आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी जिल्ह्यात अशी घटना घडणे हे अत्यंत चिंताजनक आहे. महिला डॉक्टरच्या मृत्युमागील सत्य बाहेर येईपर्यंत संपूर्ण पोलिस यंत्रणा आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सातारा जिल्ह्यात महिला, मुली असुरक्षित — ५ मंत्री, २ खासदार असलेला जिल्हा हादरला – महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. पाच मंत्री आणि दोन खासदार असलेल्या या जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची मालिका वाढत असून, “खाकी वर्दीवरच प्रश्नचिन्ह” निर्माण झालं आहे. सतत समोर येणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण जिल्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं चित्र दिसत आहे.
हातावर लिहिलेली सुसाईड नोट — पोलिसांवर थेट गंभीर आरोप— मृत डॉक्टरच्या हातावर थेट सुसाईड नोट लिहिलेली आढळली आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की — “पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला.” या खुलाश्यांमुळे जिल्हा पोलिस दलावर जबरदस्त प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलिसच जेव्हा अत्याचाराचे आरोपी ठरतात, तेव्हा सर्वसामान्य महिलांचा विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
वाद, चौकशी आणि मानसिक छळामुळे आत्महत्या— मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलिस व आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या तणावानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देत म्हटलं होतं — “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन.” मात्र, या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
संपूर्ण सातारा हादरला — संतापाची लाट — महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. नागरिक, महिला संघटना आणि डॉक्टर समुदायाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महिलांना सुरक्षिततेची हमी देणाऱ्या प्रणालीतच दोष निर्माण झाल्याचं दिसत असल्याने शासन आणि प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.
सरकार आणि पोलीस यंत्रणेवर टीका — या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही संताप व्यक्त केला जात आहे. “जिल्ह्यात पाच मंत्री आणि दोन खासदार असताना महिलांच्या सुरक्षेची अशी परिस्थिती का?” असा सवाल विचारला जात आहे. महिला डॉक्टर प्रकरणी पोलिसांची भूमिका आणि चौकशीतील विलंब यावरून नागरिक प्रशासनावर तुटून पडले आहेत.
स्वतंत्र चौकशीचे आदेश — या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोपी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला संघटनांकडून करण्यात आली आहे. राज्य सरकारकडूनही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
फलटणमधील ही घटना केवळ साताऱ्याची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिष्ठा हादरवणारी आहे. महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सत्य बाहेर येऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सत्यप्रभा न्यूज करत आहे.