नांदेड दि.१३ डिसेंबर : नागनाथ वयाच्या २० व्या वर्षी भारतीय हवाई दलात तर त्याअगोदर त्याचाच मोठा भाऊ साईनाथ वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय नौसेना दलात दाखल..
फुलवळ ता. कंधार , जि. नांदेड येथील सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेऊन वयाच्या ६ व्या वर्षीच वडिल ( संजय नारायणराव मंगनाळे ) च तर वयाच्या १४ व्या वर्षी आई ( शिवकांता संजय मंगनाळे ) च छत्र गमावलेल्या नागनाथ (ओम) संजय मंगनाळे ने परिस्थितीची जाणीव ठेवून जिद्दीने पेटून अपार मेहनत करत वयाच्या २० व्या वर्षीच भारतीय हवाई दल ( इंडियन एअर फोर्स ) मध्ये आपलं स्थान पक्क केले असून ता. २७ डिसेंबर २०२५ रोजी बेळगाव येथे तो दाखल होणार आहे. त्याच्या एवढ्या कमी वयात त्याने जिद्दीने मिळवलेल्या यशा बद्दल व त्याच्या निवडी बद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत असून भारतीय हवाई दलामध्ये दाखल होणार तो फुलवळचा पहिला भूमिपुत्र ठरला आहे. फुलवळ सारख्या ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या नागनाथ मंगनाळे ची जन्म तारीख ३ एप्रिल २००५ , नागनाथ चे प्राथमिक शिक्षण येथीलच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत झाले , माध्यमिक शिक्षण श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ येथे तर उच्यमाध्यमिक शिक्षणासाठी त्याने श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे पूर्ण केले. काही महिन्यापूर्वीच इंडियन नेव्ही च्या जागा निघाल्याची जाहिरात त्याने वाचली आणि ऑनलाईन तो फॉर्म भरला. त्यात त्याची इंडियन नेव्ही मध्ये गेलेल्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एस.एस.आर पदासाठी त्याची निवड झाली. पण त्यातच त्याने भारतीय हवाई दलाच्या जागा निघाल्याची जाहिरात पाहून त्यासाठी ही ऑनलाईन फॉर्म भरला होता. त्यानुसार त्यात तो चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाला. आणि नुकतेच ता . ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या निवड यादीत नागनाथ ची भारतीय हवाई दलात एक नाही तर दोन अनुक्रमे वाय ग्रुप रॅली भरती आणि वाय ग्रुप स्टार इंटेक अशा दोन पदासाठी एकदाच निवड झाल्याने भारतीय हवाई दलात दाखल होणारा नागनाथ मंगनाळे हा पहिला भूमिपुत्र ठरला असून त्याच्या या गगनभरारी आकाशाला गवसणी घालणाऱ्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. बालपणातच आई - वडिलांचं छत्र गमावल्यानंतर घरची परिस्थिती सर्वसाधारण असून आता या दोन्ही चिमुकल्या भावंडांना कोण आणि कसे सांभाळणार याचा विचार करून त्यांचे मामा तुकाराम नामदेव मुदखेड राहणार मानसपूरी ता. कंधार यांनी या दोन्ही भावंडांना आपल्या गावी घेऊन जाऊन त्यांना पुढील शिक्षण देत त्यांचा सांभाळ केला. त्यात वडील मुलगा साईनाथ संजय मंगनाळे हा २०२२ मध्ये वयाच्या १९ व्या भारतीय नौसेना दल ( इंडियन नेव्ही ) मध्ये दाखल झाला. तर आता हा दुसरा नागनाथ मंगनाळे ची नुकतीच भारतीय हवाई दलात (इंडियन एअर फोर्स )मध्ये निवड झाली आहे. नागनाथ व साईनाथ या भावंडांच्या या झालेल्या निवडीबद्दल फुलवळसह परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल नागनाथ(ओम) मंगनाळे यांची प्रतिक्रिया घेतली असता तो म्हणाला की , वडिलाच्या व आईच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि त्यांच आमच्यामुळे नावलौकिक व्हावे यासाठी काहीतरी करून दाखवायचे अशी जिद्दच आपण उराशी बाळगली होती . यात आम्हाला आमच्या मामाची मिळालेली साथ ही सर्वात मोठा सिंहाचा वाटा असून परिस्थितिची जाणीव ठेवून यावर मात करण्यासाठी त्यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहित केले. तसेच माझ्या मोठ्या भावाने पण प्रत्येकवेळी मोलाचे सहकार्य केले आणि माझ्या सर्व गुरुजनांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करत माझ्यात नेहमीच नवचेतना निर्माण करण्याचे काम केले म्हणूनच मी इथपर्यंत पोहचू शकलो. असे सांगून तो म्हणाला की मनात जिद्द असेल आणि कष्ठ , मेहनत करण्याची वृत्ती असेल तर यश नक्कीच आपल्या जवळ आहे एवढेच यातून मी शिकलो , असे सांगून अनेकांनी ही नोकरी खूप अवघड असते असे सांगीतले असतानाही माझ्या मामाने व भावाने मला मोठ्या आनंदाने प्रोत्साहन देऊन भारतीय हवाई दलात दाखल होण्यासाठी प्रेरणा दिली ही माझ्यासाठी खूप मोलाची शिदोरी असून ती मी नेटाने सांभाळत देशाची सेवा प्रामाणिकपणे करणार असा निर्धार ही त्याने बोलून दाखवला.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













