भारतीय शेअर बाजारात(Stock Market) आज (25 एप्रिल) रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 589 अंकांनी घसरुन 79212.53 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 207.35 अंकांनी घसरुन 24039.35 अंकांवर पोहोचला. यामुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांकडून मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.यामुळं गुंतवणूकदार सतर्क झाल्याचं दिसून आलं याशिवाय आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत कंपन्यांच्या कामगिरीचे आकडे अपेक्षेप्रमाणं नसल्यानं आणि नफा वसुलीच्या धोरणामुळं शेअर बाजारात घसरण झाली आहे.
स्मॉल कॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अडीच टक्क्यांनी घसरले आहेत. आयटी सेक्टर सोडून इतर क्षेत्रात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
गुरुवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं बाजारमूल्य 429.63 लाख कोटी रुपये इतकं होतं. आज बाजार बंद झाला तेव्हा बाजारमूल्य 420.83 लाख कोटी रुपयांवर आलं आहे. म्हणजेच बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं बाजारमूल्य 8.8 लाख कोटींनी घटलं आहे.
बीएसई सेन्सेक्सवरील 30 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे शेअर तेजीत होते. इतर 24 शेअरमध्ये मोठी घसरण झाली. तेजी असणाऱ्या शेअरमध्ये टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदूस्तान यूनिलिव्हर, इंडसइंड बंकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
बीएसईवरील 4084 शेअर पैकी 715 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर 3248 कंपन्यांचे शेअर घसरले. तर, 121 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही.













