हिमायतनगर (प्रतिनिधी) | नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीने सीमा ओलांडली असून, हिमायतनगर शहरात भर आठवडी बाजाराच्या दिवशी उमर चौकात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. राजकीय वैमनस्य आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या या वादात धारदार शस्त्रांचा मुक्त वापर करण्यात आल्याने ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
भरबाजारात थरार, शस्त्रांनी सपासप वार
मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर येथील उमर चौकात किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गट एकमेकांविरुद्ध शस्त्रांसह भिडले. यावेळी तलवारी, चाकू आणि धारदार शस्त्रांनी एकमेकांवर सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात शेख शाकीर, शेख रईस आणि शेख कलीम हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एका जखमीचे वार लागल्यामुळे चक्क आतडे बाहेर आले होते, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
दोघांची प्रकृती चिंताजनक; नांदेडला हलवले
जखमींपैकी शेख रईस आणि शेख कलीम यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना तातडीने नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर शेख शाकीर यांच्या हातावर गंभीर जखमा असून त्यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगरसेवकासह ७ जणांवर संशयाची सुई
या प्राणघातक हल्ल्यात हिमायतनगर येथील वार्ड क्रमांक १५ चे काँग्रेस उमेदवार व नगरसेवक शेख इलियास यांच्यासह शेख अफरोज, शेख फिरोज, शेख इमरान, शेख इजाज, शेख जावेद, शेख मेहमूद तहारी यांचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय वादातून हा हल्ला घडवून आणल्याची चर्चा हिमायतनगरमध्ये रंगली आहे.
प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
भर बाजारपेठेत दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून, संशयितांचा शोध सुरू केला आहे.
ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – ‘सत्यप्रभा न्यूज’ (सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…)





















