मुंबई : माणसाच्या जाती-धर्माच्या पलिकडेही माणुसकी नावाची गोष्ट असते. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला तो माणुसकीला काळीमा फासणारा आहे. त्यामुळे आरोपींची जात-धर्म न पाहता त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. रुग्णाकडे 10 लाखांची मागणी करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मनपा आणि इन्कम ट्रक्स विभाग काय कारवाई करणार हे स्पष्ट करावं असंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे स्वतंत्र वैद्यकीय कक्ष आहेत. पण त्याचा काय उपयोग? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जाऊनही त्या रुग्णालयात महिलेला दाखल करुन घेतलं नाही. या रुग्णालयातील प्रशासन इतकं मग्रुर का आहे याचं उत्तर सरकारने द्यावं. या हॉस्पिटलचे डॅश बोर्ड आहे की नाही याची माहिती सरकारने द्यावी. तसेच राज्य सरकार हे रुग्णालय ताब्यात घेणार का? हेदेखील स्पष्ट करावं.”
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णालयाच्या प्रशासनाला अनेक फोन गेले. पण कोणाचाही फोन येऊ दे, दहा लाक भरल्याशिवाय अॅडमिट करुन द्यायचे नाही असा आदेश देण्यात आला. हे कृत्य माणूसकीला काळीमा फासणारं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या या प्रकरणाची सखोल तपासणी व्हावी आणि रुग्णालयावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “काही विषयांवर आम्ही राजकारण टाळत असतो. काल भाजपच्या महिलांनी एका डॉक्टरच्या क्लिनिकवर आंदोलन केले. आम्हीदेखील आंदोलन केले. या राज्यात भाजपचे कार्यकर्तेच सुरक्षित नाहीत. ज्या राज्यात मुख्यमंत्री स्वतःच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसतील तर नागरिकांनी काय करायचे?
आदित्य ठाकरे म्हणाले की, “या हॉस्पिटलने टॅक्स भरला की नाही माहीत नाही. एक रुपयाच्या भाडेतत्वावर हॉस्पिटल घेतात आणि पुढे काय होते? फडणवीस या हॉस्पिटलवर कारवाई करणार का? इमर्जन्सी असेल तर कोणत्याही रुग्णाला डिपॉजिटसाठी दाखल करुन घेण्यास थांबवू नका असा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता.”
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंबंधी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड झालं आहे. मंगेशकर हॉस्पिटलने एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून तसं लिहून दिल्याचं समोर आलं. सरकारी योजनांचा लाभच दिला जात नसेल तर सरकारी योजनांचा फायदा काय असा सवाल परशूराम हिंदू सेवासंघाने केला आहे.