हिंगोली दि.१ फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (३१ जानेवारी) दुपारी ५ वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणे हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मात्र, सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मी राजकीय डावपेचांवर भाष्य करू शकत नाही. अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता.”
पुढे बोलताना त्यांनी सावधतेचा इशाराही दिला. ते म्हणाले, “हा त्यांचा राजकीय डावपेच असू शकतो, हे मी सांगू शकत नाही. मात्र, सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे. जे लोक आधी गिधाड नव्हते, ते आता घिरट्या घालू लागले आहेत. त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. दादा हे दादा होते. दादांसोबत जे लोक दिसत नव्हते, ती गिधाडं आता दिसू लागली आहेत.”
सुनेत्रा पवार यांना सल्ला देताना जरांगे म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांनी अचानक जमा झालेल्या ढेकणांवर लक्ष ठेवावे. हे ढेकणं आणि गिधाडं घात करू शकतात. सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घेऊन चालावे. हे ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात, अशा वेळी कुटुंबच तुमच्या कामाला येईल. काही अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारले असावे.” तसेच पार्थ आणि जय पवार यांनी अजितदादांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे, असेही त्यांनी नमूद केले.
बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, “हे कुठेही पळतात, त्यांना काही मिळत नाही. अजित पवार जेवढे हुशार आहेत, तेवढेच फडणवीसही हुशार आहेत, ते त्यांना जवळ करणार नाहीत. आतापर्यंत यांचे दुखत होते, पण यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.”












