गजानन राऊत मेहकर दि.१९ ऑक्टोबर
समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यात फर्दापूरजवळ चॅनेल नंबर २९४ वर १८ ऑक्टोबरला सकाळी साडेसात वाजता ट्रक उलटला. क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करताना दुपारी बारा वाजता नागपूरकडे जाणारी तिन्ही लेनवरील वाहतूक थांबवण्यात आली. यामुळे तासभर दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे वाहनधारकांना ताटकळत बसावे लागले.
सध्या दिवाळीचा सण आल्याने मुंबई, पुणे भागात नोकरीनिमित्त राहणारे नागरिक आपापल्या गावी परतण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर करीत आहेत. परंतु हा ट्रक उलटल्याने
सुखकर प्रवासात व्यत्यय आला.समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने एमएच-०४-एमएच-५९९३ क्रमांकाचा ट्रक निघाला होता. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मेहकर तालुक्यातील फर्दापूर शिवारात ट्रक उलटला. या घटनेत चालक किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर बाजूच्या लेनवरून वाहतूक सुरू होती. पोलिसांनी क्रेन आणून ट्रक बाजूला करण्यासाठी मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जाणारी विविध लेनवरील वाहतूक रोखून धरली. तोपर्यंत सुमारे दोनकिलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पोलीस कर्मचारी विकास कोळी, भुतेकर यांच्यासह एसएसएफ जवान व क्यूआरव्ही टीमने वाहतूक क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली.













