नांदेड २१ : शिक्षण क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी विद्यार्थ्यांना नवे दृष्टीकोन देणारे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा तालुका लोहा येथील मुख्याध्यापक तथा उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांची महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत सिंगापूर आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाला आहे. कोरोना काळात घरचा अभ्यास हा स्तुत्य उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. तसेच, शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक म्हणून भरीव योगदान दिले. तंबाखूमुक्त शाळा अभियानात त्यांनी शाळा व कुटुंबांमध्ये जागरूकता निर्माण करून सकारात्मक बदल घडवला.
विद्यार्थ्यांसाठी भविष्यवेधी शिक्षणाच्या दृष्टीने लर्निंग टू लर्न उपक्रमाअंतर्गत त्यांनी जपानी व जर्मन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग करत चला इंग्रजी वाचूया-लिहूया उपक्रम राबवला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वृक्ष वाचनालय 2023 पासून नियमित सुरू ठेवत विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवली.
शालेय जीवनात भारत स्काऊट-गाईड पथकाची स्थापना करून जिल्हास्तरावर विविध पुरस्कार मिळवले. हरित शाळा, तंबाखूमुक्त शाळा, प्लास्टिकमुक्त शाळा या संकल्पनांद्वारे शाळेला एक वेगळी ओळख मिळवून दिली. राष्ट्रीय बाल परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करून त्यांचे नेतृत्वगुण विकसित केले.
रवी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे यूट्यूब चॅनल सुरू आहे. यात ४५० हून अधिक शैक्षणिक उपक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. समग्र शिक्षा पोर्टलवर शैक्षणिक साहित्य निर्मिती करत त्यांनी आपल्या ज्ञानसंपदेचा उपयोग केला. तसेच श्री विसर्जन काळात निर्माल्य संकल्पना अविरतपणे राबवून पर्यावरणपूरक दृष्टिकोन जपला आहे.
या सर्व कार्याची दखल घेत नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत त्यांची आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. दिनांक २२ ते २७ मार्च २०२५ दरम्यान सिंगापूरमधील शैक्षणिक धोरणांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना ही संधी मिळणार आहे. दोन दिवस प्रशिक्षण व दोन दिवस तेथील शाळांना भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेण्याचा त्यांचा हा दौरा असेल.
या यशस्वी निवडीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, शिक्षण अधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, योजना शिक्षणाधिकारी दिलीप कुमार बनसोडे, उप शिक्षणाधिकारी संतोष शेटकार, डॉ. दादाराव शिरसाट, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, गट शिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, साहित्यिक डॉ. राम वाघमारे, मारतळा गावचे उपसरपंच प्रतिनिधी तथा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर पाटील ढगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश पाटील ढेपे आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड