नांदेड दि.२: मराठवाड्यातील तीन जणांसह या तिसऱ्या यादीत 5 उमेदवारांची नावे आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत एकूण २४ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. तिसऱ्या यादीत नांदेडसाठी अविनाश भोसीकर, परभणीत बाबासाहेब उगले, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)मधून अफसर खान, मंगलदास बांदल हे शिरूरमधून तर पुण्यातून वसंत मोरे या प्रभावी व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करून दि. २९ मार्च रोजी राजगृहावर प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. “मी शंभर टक्के पुणे लोकसभेची निवडणूक लढणार आहे. मी माझं नशीब समजतो की, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मला इथं बोलावलं. मला त्यांनी पुरेसा वेळ दिला, त्यातून आमची अतिशय चांगली चर्चा झाली.” असे वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. तेंव्हाच पुण्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार असल्याचे बोलल्या जात होते, ते अखेर आज खरे ठरले आहे.

वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी सायंकाळी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. बहुप्रतिक्षित असलेल्या नांदेडच्या जागेसाठी अखेर ॲड. अविनाश भोसीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रकाश शेंडगे यांच्या ‘ओबीसी बहुजन पक्षा’कडून भोसीकर यांना अगोदरच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सातत्याने संपर्कात राहून नांदेडसाठी ‘वंचित’ची उमेदवारी मिळवली असल्याचे अविनाश भोसीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल
बारामती लोकसभा मतदार संघामध्ये मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने घेतला असल्याचे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी जाहीर केले आहे. तर ओबीसी बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी सांगली येथून निवडणूक लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अगोदरच जाहीर केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने काही ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठींबा दिला आहे. त्या मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि उमेदवार ‘वंचित’च्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी संपर्क साधत आहेत. यासाठी अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर वादावादी झाल्याचे आढळून आले आहे. नांदेडमध्ये देखील काही दिवसापूर्वीच ‘वंचित’चे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी पत्रकार परिषद घेऊन नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ‘वंचित’चा पाठिंबा नसल्याचे जाहीर केले होते. नांदेडसाठी उमेदवार घोषित करण्याची वरिष्ठांना विनंती देखील त्यांनी केली होती. या तिसऱ्या यादीत अखेर नांदेडचा उमेदवार जाहीर करण्यात आल्याने नांदेडमध्ये वंचित स्वतंत्र लढणार हे निश्चित झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यालयातून पक्षाची अधिकृतरित्या स्पष्ट सूचना आल्याशिवाय, मित्रपक्षांच्या प्रचारात ‘वंचित’च्या जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केले आहे.
‘वंचित’च्या दुसऱ्या यादीतील अधिकृत उमेदवारांची नावे अणि मतदार संघ
१) ॲड. अविनाश भोसीकर (नांदेड)
२) बाबासाहेब उगले (परभणी)
३) अफसर खान (औरंगाबाद)
४) वसंत मोरे (पुणे)
५) मंगलदास बांदल (शिरूर)
#सत्यप्रभा न्युज #नांदेड