मुंबई दि.१० फेब्रुवारी: नवी मुंबईतील वाशी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, जिथे एका वॉर्ड बॉयने स्वतः डॉक्टर असल्याचे भासवत एका तरुणीवर उपचार केले, ज्यामुळे त्या २१ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील बोगसगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव प्रचिती भुवड असे असून, त्या वाशी येथील सेक्टर ११ मधील गिरीधर निवास या इमारतीत वास्तव्यास होत्या. प्रचिती यांना ‘पीसीओडी’चा (पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) म्हणजेच हार्मोनल असंतुलनाचा त्रास होता. या आजारावर उपचार करण्यासाठी त्या एका चांगल्या डॉक्टरांच्या शोधात होत्या. दरम्यान, त्यांच्या वडिलांची भाची असलेल्या प्रियांका महाडिक हिने त्यांना संदेश पश्ते (वय ३०) या व्यक्तीबद्दल माहिती दिली. प्रियांका हिने यापूर्वी याच आजारासाठी संदेश पश्ते याच्याकडून उपचार घेतले होते आणि तिला बरे वाटले होते, त्यामुळे तिने आपल्या मामाला म्हणजेच प्रचितीच्या वडिलांना, भिकुराम भुवड यांना, पश्ते याच्याकडून उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. संदेश पश्ते हा रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करतो, असेही सांगण्यात आले होते.
मात्र, धक्कादायक बाब अशी की, संदेश पश्ते हा अधिकृत डॉक्टर नसून तो केवळ बारावी पास आहे आणि अंधेरी येथील एका नर्सिंग होममध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. तरीही, त्याने डॉक्टर असल्याचे भासवत प्रचितीवर उपचार करण्यास सुरुवात केली. ५ फेब्रुवारी रोजी भुवड कुटुंबीयांनी उपचारासाठी पश्ते याची भेट घेतली. यावेळी त्याने प्रचितीला एमेसेट (Emeset) आणि डायनापर (Dynapar) ही दोन इंजेक्शन्स नसांवाटे (Intravenous) दिली.
हे इंजेक्शन दिल्यानंतर प्रचितीची तब्येत सुधारण्याऐवजी ती वेगाने खालावत गेली. तिची प्रकृती चिंताजनक होत असल्याचे पाहून, घाबरलेल्या वडिलांनी आणि आरोपी संदेश पश्ते याने तिला तातडीने वाशी येथील पीकेसी या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला तपासाअंती ‘ब्रॉड डेड’ (उपचारापूर्वीच मृत) घोषित केले.
या दुर्दैवी घटनेनंतर वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासात आरोपी संदेश पश्ते हा डॉक्टर नसून तो मानखुर्दचा राहणारा एक वॉर्ड बॉय असल्याचे उघड झाले. मृत तरुणीचे वडील भिकुराम भुवड यांनी ६ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संदेश पश्ते याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी वाशी एनएमएमसी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले की, प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार या तरुणीचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाल्याचे दिसून येत आहे. मृत्यूचे नेमके आणि निश्चित कारण शोधण्यासाठी व्हिसेराचे नमुने हिस्टोपॅथॉलॉजी तपासणीसाठी जतन करण्यात आले असून, ते कलिना येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे नवी मुंबई परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांना बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.













