पुणे दि.३१ जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांच्या अचानक झालेल्या एक्झिटने (Ajit Pawar Sad Demise) संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. या धक्कादायक घटनेनंतर पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपले काका अजित पवार यांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे, जी वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
“मस्तक सुन्न आणि मन गोठलंय…” अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त करताना रोहित पवार यांनी लिहिले की, “दादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे, मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय.” अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि मनाची अवस्था रोहित पवारांनी शब्दांत मांडली आहे.
“दादा, तुमच्याविषयी माझी एक तक्रार आहे…” आपल्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी अजितदादांबद्दल एक जिव्हाळ्याची तक्रार देखील केली आहे. ते म्हणतात, “दादा, तुमच्याविषयी माझी एक तक्रार आहे. एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चारचौघात झापझाप झापणारे तुम्ही, त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? असं म्हणून तुम्ही तिलाही माघारी पाठवायला हवं होतं.”
राख सावडताना अश्रू अनावर बारामतीत ज्या ठिकाणी अजितदादांनी विकासाची बाग फुलवली, तिथेच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा शब्दांत रोहित पवारांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. “आज अस्थी गोळा करताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभे राहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल.. ‘अरे गधड्यांनो, रडताय काय? मी तुमची गंमत केली..'” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
“लव्ह यू दादा…” शेवटी, “दादा कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला एकदा घट्ट मिठी मारायचीय.. लव्ह यू दादा..,” असे म्हणत रोहित पवारांनी आपल्या लाडक्या काकांना श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावरही शोकाकुल वातावरण पसरले आहे.













