पुणे/पिंपरी-चिंचवड दि.३१ जानेवारी: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार( Ajit pawar) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील या मोठ्या पोकळीमुळे सर्वच पक्षांतील नेते हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत एक अत्यंत भावूक प्रसंग उपस्थितांनी अनुभवला. भाजपचे भोसरीचे आमदार आणि अजितदादांचे कट्टर राजकीय विरोधक महेश लांडगे यांना भाषणादरम्यान अश्रू अनावर झाले आणि त्यांनी भर सभेत अजितदादांची माफी मागितली.
गेल्या काही काळापासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात ‘दादा विरुद्ध दादा’ (अजित पवार विरुद्ध महेश लांडगे) असा तीव्र संघर्ष पाहायला मिळत होता. महापालिका निवडणुका आणि विविध विकासकामांच्या मुद्द्यावरून महेश लांडगे यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. अनेकदा त्यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान दिले होते. मात्र, काळाने घाला घातल्यानंतर हे सर्व वैर संपुष्टात आले आहे.
श्रद्धांजली सभेत बोलण्यासाठी महेश लांडगे उभे राहिले, पण त्यांच्या कंठातून शब्द फुटत नव्हते. डोळ्यातून अश्रू वाहत असतानाच त्यांनी हुंदका आवरत म्हटले, “दादा, राजकारणाच्या ओघात मी तुम्हाला खूप काही बोललो. तुमचा एकेरी उल्लेख केला, टीका केली. पण आज तुम्ही नाहीत हे सत्य पचवता येत नाहीये. दादा, मला माफ करा…”
अजितदादांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या महेश लांडगे( Mahesh Ladnge ) यांना पुढे बोलणे शक्य झाले नाही. अवघ्या ४० सेकंदातच त्यांनी भाषण थांबवून व्यासपीठावरून खाली उतरणे पसंत केले. त्यांचा हा आकांत पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. राजकीय आखाड्यात एकमेकांवर तुटून पडणारे नेते मृत्यूच्या दारात कसे नतमस्तक होतात, याचे हे हृदयद्रावक दृश्य होते.













