दिल्ली दि.१ फेब्रुवारी: वर्ष २०२६ मधील देशातील सर्वात मोठी आर्थिक घडामोडी म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. दिनांक २९ जानेवारी रोजी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला असून, येत्या रविवारी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा आगामी वर्षाचा आर्थिक लेखाजोखा मांडणार आहेत. यंदाचा हा अर्थसंकल्प अनेक कारणांनी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प असून, तो सादर करण्यासोबतच निर्मला सीतारामन यांच्या नावावर सलग नऊ वेळा बजेट सादर करण्याचा अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे.
येत्या १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री संसदेमध्ये २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करतील. आगामी आर्थिक वर्षातील सरकारच्या धोरणांची आणि योजनांची दिशा या भाषणातून स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे.
रविवारी बजेट सादर होण्याची पहिलीच वेळ सहसा संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आठवड्यातील कामकाजाचा दिवस निवडला जातो, मात्र भारतीय संसदीय इतिहासात यंदा पहिल्यांदाच रविवारी, सुट्टीच्या दिवशी (१ फेब्रुवारी) बजेट सादर केले जाणार आहे. यापूर्वी २०१७ सालापर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत होती. मात्र, तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही परंपरा बदलून १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली. यंदाच्या अर्थसंकल्पातून देशातील उद्योग जगत, शेती आणि इतर विविध क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा असून, कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कर रचनेत (Tax Slab) काय बदल होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक संसदेच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ २८ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाला आहे. हे संपूर्ण अधिवेशन दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा २८ जानेवारीपासून सुरू झाला असून तो १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर, विविध मंत्रालयांच्या मागण्यांवर आणि घोषणांवर संसदीय समित्यांमध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी कामकाजात मोठा ब्रेक घेतला जाईल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होऊन २ एप्रिल २०२६ रोजी समाप्त होईल.
बजेटचे थेट प्रक्षेपण आणि कागदपत्रे कोठे मिळतील? अर्थसंकल्प कोठे आणि कसा पहावा, याबद्दल अनेकदा नागरिकांमध्ये संभ्रम असतो. जर तुम्हाला २०२६ चा अर्थसंकल्प थेट (Live) पाहायचा असेल, तर टीव्ही ९ मराठीवर तुम्हाला याची इत्यंभूत माहिती आणि विश्लेषण पाहता येईल. तसेच, अर्थमंत्र्यांचे भाषण पूर्ण झाल्यानंतर, सामान्य नागरिकांना अर्थसंकल्पाची प्रत आणि इतर संबंधित कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जातात. ही माहिती सरकारच्या indiabudget.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाऊनलोड करता येईल. याव्यतिरिक्त, भारत सरकारच्या ‘युनियन बजेट मोबाईल ॲप’वर देखील सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात वाचण्यासाठी उपलब्ध असतील.













