मुंबई दि. २ फेब्रुवारी: मुंबईतील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आज एक अत्यंत महत्त्वाची भेट पार पडली. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या दुखद निधनाच्या पार्श्वभूमीवर, गौतम अदानी यांनी शरद पवार यांची ही सांत्वनपर भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, या भेटीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांचे वादळ निर्माण केले आहे. जरी ही भेट प्रामुख्याने सांत्वन करण्यासाठी होती असे अधोरेखित करण्यात आले असले, तरी सध्याच्या संवेदनशील राजकीय परिस्थितीमध्ये या भेटीकडे अतिशय गांभीर्याने पाहिले जात आहे. अजित पवार यांच्या अकस्मात एक्झिटनंतर पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबद्दल (Merger) राजकीय गल्लीबोळात जोरदार चर्चा सुरू आहेत. अशातच देशातील या बड्या उद्योगपतीने जेष्ठ नेते शरद पवार यांची घेतलेली ही भेट भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते, असे बोलले जात आहे.
या भेटीदरम्यान दोन्ही दिग्गजांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा अधिकृत तपशील जरी समोर आलेला नसला, तरी ही भेट केवळ सांत्वनापुरती मर्यादित नसून त्यामागे मोठी राजकीय गणिते असू शकतात, असा अंदाज विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. या भेटीने आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि पक्षांतर्गत घडामोडींना वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.













